स्थैर्य, कोयनानगर, दि. १३ (महादेव येडगे) : कोयना धरणाच्या डाव्या तिरावर उभा राहत असलेला वीज प्रकल्प जल संपदा व ऊर्जा विभाग समन्वय साधून एकत्रितपणे पूर्ण करणार आहे. लवकर या प्रकल्पाचे काम चालु करून हा प्रबहुउद्देशीय प्रकल्प मार्गी लावणार असल्याचा विश्वास राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
उर्जा विभाग व जलसंपदा विभागाकडील जल विद्युत प्रकल्पांसंदर्भातील विविध विषयांबाबत आज उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या बरोबर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बैठक करून विविध प्रकल्पाचा आढावा घेवून चर्चा केली.
या बैठकीत महाजनको कडे भाडेतत्त्वावर हस्तांतरित केलेल्या २७ जलविद्युत प्रकल्पांचा करार करण्याबाबत सकारात्मक चर्चा होवून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी महानिर्मिती व महावितरण कंपनीकडून जलसंपदा विभागास देय असलेल्या भाडेपट्टी तसेच वीज रकमेच्या थकबाकीबाबतही उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे लक्ष वेधले.
तसेच कोयना धरण पायथा विद्युत गृह क्र. २ (डावा तीर) प्रकल्पाला महावितरण कंपनीमार्फत सहमती घेतली आहे. राज्यातील उपसासिंचन योजना चालवण्यासाठी स्वस्त दरात वीज कशी मिळवता येईल याबाबत अभ्यास केला जाईल. सौर, पवन, जलविद्युत हायब्रीड प्रकल्प धोरणाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. अनेक प्रकल्पांच्या नुतनीकरण, आधुनिकीकरण, क्षमतावाढ करणेबाबत व प्रकल्पांची देखभाल करण्यासाठी दिशा ठरवण्यावरही चर्चा झाली असून जलसंपदा तसेच उर्जा विभाग एकत्रितपणे समन्वय साधून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न येत्या काळात करणार असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.