
दैनिक स्थैर्य । 16 एप्रिल 2025। फलटण । कोयना दौलत डोगरी महोत्सवाचे 15 ते 17 एप्रिल या कालावधीत दौलतनगर मरळी ता.पाटण येथे आयोजन करण्यात आले आहे. अभिनव संकल्पना राबवत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या महोत्सवाच्या उद्घाटनाचा सन्मान शेतकर्यांना दिला. पाच शेतकर्यांनी सपत्नीक या महोत्सवाचे उद्घाटन केले.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी विश्वास सिद, विभागीय वन अधिकारी एच.एस. वाघमोडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी सारखर कारखान्याचे संचालक यशराज देसाई, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, डोंगरी भागातील नागरिक शहरात जावून या उपक्रमांचा लाभ घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रतील हा पहिलाच डोंगरी महोत्सव आहे. कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे स्टॉलही आहेत. या महोत्सवामध्ये पशु-पक्षी प्रदर्शन, घोडेस्वार, वॉटर स्पोर्ट, इलेक्ट्रिक बग्गी, पॅरालायडींग अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
महाबळेश्वर महापर्यटन उत्सव 2 ते 4 मे या कालावधीत पार पडणार आहे. या उत्सवात उद्योजकांबरोबर बचत गटांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. हेलीकॉप्टर राईड, शस्त्र प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमासह, महाबळेश्वर बाजार पेठेतून शोभा यात्रा असे पर्यटकांच्या आकर्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या पुढे प्रत्येक वर्षी महसूल विभागात महापर्यटन महोत्सव राबविण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
कोयना दौलत डोंगरी महोत्सवामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा महिला बचत गटांच्या महिलांनी लाभ घ्यावा. ज्या बाबी केवळ आपण मोठ्या शहरांमध्ये पाहत आले आहेत त्या सर्व या महोत्सवाच्या निमित्ताने आपण डोंगरी भागातील लोकांना अत्यंत अल्प शुल्क मध्ये उपलब्ध करुन दिले आहेत. अत्यंत चांगले कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. महिला बचत गटांनी उत्पादित मालाला बाजार पेठ देण्याच्या दृष्टीने आपण पाचगणी येथे सातारा जिल्ह्यातील पहिला मॉल उभा करत आहोत. या ठिकाणी परदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. याचा आदर्श घेऊन सर्व जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालासाठी मॉल उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत. याची सुरुवात सातारा जिल्ह्यातून आपण पहिल्यांदा केली याचा मनस्वी आनंद आहे. महिला अत्यंत सृजनशील असतात तुमच्या सर्व नाविन्यपूर्ण कल्पनांना माझा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पाठींबा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कोयना दौलत डोंगरी महोत्सवात महाराष्ट्राती पहिले फळांचे गाव धुमाळवाडीची प्रतिकृती, महात्मा गांधी रोजगारहमी योजनेंतर्गत बांबू लागवड, ऊस पाचट व्यवस्थापन, अन्न-पौष्टिक तृणधान्य महत्व, एकात्मिक फालेत्पादन विकास अभियान, महाडिबीटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजना, राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय व्यवस्थापक, पर्यटन संचालनालय, कृषी विज्ञान केंद्र, अन्न प्रक्रिया उद्योग, मत्स्य पालन, भात उत्पादन, खादी ग्रामोद्योग, रेशीम शेती एकात्मिक कीड व्यवस्थापन यासह अनेक शेतकर्यांना उपयोगी पडणार्या स्टॉची उभारणी करण्यात आली आहे. या स्टॉलच्या माध्यमातून शेतकर्यांनी प्रगत शेती कशी करावी या विषयी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच कृषी औजारे, कृषी संलग्न वाहने, बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री व्हावी यासाठी या महोत्सवात स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.