स्थैर्य, सातारा, दि.२४: कोयना पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून शिवाजी सागर जलाशयात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या जलाशयात ७ हजार २७८ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. १०५.२५ टीएमसी इतकी पाणीसाठवण क्षमता असलेल्या धरणातील साठवण क्षमता संपुष्ठात आल्याने धरणाचे सहा वक्री दरवाजे पाऊन फुटाने उचलून ७ हजार १७४ आणि पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीनंतर २ हजार १०० असा एकूण ९ हजार २७४ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला असल्याची माहिती धरण व्यवस्थापन सुत्रांकडून देण्यात आली.
चालूवर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने कोयना धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. ऑगस्ट महिन्यात धरणातील पाणीसाठ्याने नव्वदी पार केली होती. ऑगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत होती. त्यामुळे १४ ऑगस्ट रोजी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झाली होती. तब्बल ५६ हजार क्युसेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होवून पाटणसह, कराड, सांगली परिसरात महापुराचा धोका निर्माण झाला होता. मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही बंद करण्यात आला होता. अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा शंभरीकडे निघाला होता. अखेर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पाणलोट परिसरात पावसाने सुरूवात केल्याने सध्याच्या घडीला कोयना धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
कोयना धरण सद्यस्थितीत पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात १०५.२५ टीएमसी एवढा पाणी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी १ वाजता धरणाचे २ दरवाजे एका फुटाने उघडून व पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र दिवसभरात शिवाजीसागर जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक वाढतच गेल्याने धरणाचे सर्व दरवाजे पाऊण फुटाने उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
सध्या धरणात ७ हजार २७८ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. दि. ७ जूनपासून आजअखेर कोयनानगर येथे (४२९६), नवजा (४९७२), महाबळेश्वर (४९२६) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर आजची पाणीपातळी २१६३.०६ फूट व ६५९.४३५ मीटर इतकी उंची झाली आहे. दरम्यान, आजच्या घडीला धरणात तब्बल १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने यापुढे धरणात पाणी साठवता येणार नाही. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला. त्यानुसार बुधवार दि. २३ रोजी कोयना धरणाचे दरवाजे सहा वक्री दरवाजे पाऊन फुटाने उघडून ७ हजार १७४ आणि पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीनंतर २ हजार १०० असे एकूण ९ हजार २७४ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, पावसाचे कमी-जास्त प्रमाण पाहता धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रात कोणीही जावू नये, असा इशाराही पाटण नगरपंचायतीकडून देण्यात आला आहे.