दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑक्टोबर २०२१ | खंडाळा | घरामध्ये घुसून कोयत्याचा धाक दाखवित युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न करणार्या आंतरजिल्हा टोळीला शिरवळ पोलीसांनी शिताफीने जेरबंद केले. मनोज संदीपान शिंदे (वय42, रा. बोराटवाडी ता.इंदापूर जि.पुणे), सचिन प्रकाश जाधव (वय 28), अजय संजय आढाव (वय 21 दोघे रा.मेडद ता.माळशिरस जि.सोलापूर) अशी संशयितांची नावे असून टोळीकडून शिरवळ पोलीसांनी सोलापूर जिल्हा, सांगली, पुणे ग्रामीण, सातारा जिल्ह्याच्या विविध पोलीस स्टेशन हद्दीमधील तब्बल 8 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी कि, शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका ठिकाणी 19 वर्षीय युवतीचा साथीदारांसमवेत अपहरण करण्याचा प्रयत्न करीत घरामध्ये शिरून घरातील व्यक्तींना कोयत्याचा धाक दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिरवळ पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यात सापळा रचत गुन्ह्यातील मनोज संदीपान शिंदे (वय42, रा. बोराटवाडी ता.इंदापूर जि.पुणे), सचिन प्रकाश जाधव (वय 28), अजय संजय आढाव (वय 21 दोघे रा.मेडद ता.माळशिरस जि.सोलापूर) यांना अटक केली. संशयितांकडून चैन स्नॅचिंग, जबरी चोरी, दरोडा यासारख्या गंभीर 8 गुन्ह्यांची उकल करीत लोणंद, नातेपुते, सांगोला, आटपाडी, दौंड, इंदापूर, लोणी काळभोर, शिरवळ येथील पोलीस स्टेशन हद्दीमधील गुन्हे उघडकीस आणण्यात शिरवळ पोलिसांना यश मिळाले आहे. संशयितांची कोठडीची मुदत संपल्यानंतर खंडाळा न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.