पोलीस जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी एसआरपीएफ येथे ध्यानधारणा कार्यक्रमाचे आयोजन
स्थैर्य, अमरावती, दि. 6 : कोरोना विषाणूचा संसर्ग जगात सर्वत्र झाला आहे. उघड्या डोळ्याने दिसू न शकणाऱ्या एवढ्याश्या विषाणूने देशात आणि राज्यात थैमान घातले आहे. मात्र, अशा संकटाच्या परिस्थितीतही कोविड योध्दा म्हणून पोलीस जवान आपले कर्तव्य चोख बजावित आहे. पोलीस जवानांनी ‘मी सुरक्षित राहणार आणि सारावे, असे आवाहन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आाज येथे केले.
पोलिसांचा तणाव घालवून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ठिकठिकाणी ध्यानधारणा प्रशिक्षणाचे आयोजन होत आहे. येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 9 च्या कॅम्प परिसरात ध्यानधारणा प्रशिक्षणाचे उद्घाटन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बलाचे समादेशक लोहीत मत्तानी, सहायक समादेशक प्रभाकर शिंदे, एम. बी. नेवारे, प्रशिक्षक शिवाजी कुचे यांच्यासह बलाचे जवान आदी यावेळी उपस्थित होते.
श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना विरुध्दचे युध्द जिंकण्यासाठी डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस, आरोग्य कर्मचारी कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी अहोरात्र व जीवाची पर्वा न करता राबत आहेत. या कोविड योध्दांचा तणाव दूर करुन त्यांचे मनोबल वाढविणे आवश्यक आहे. या अशा संकट काळात पोलीस जवानही आपले कर्तव्य चोख बजावित असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांना सुध्दा कुटूंब आहे, त्यांच्या घरात सुध्दा लहान मुलं आहेत, पण ते नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्यावर आहेत. सतत बंदोबस्त, ड्युटी यामुळे पोलीस जवानांवर ताण वाढला आहे. हा ताणतणाव घालविण्यासाठी योगा, व्यायामासोबतच ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. या माध्यमातून जवानांमध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होईल. आज आयोजित केलेले मेडिटेशन प्रशिक्षण पोलीस जवानांसाठी नियमितपणे राबवले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
समादेशक श्री. मत्तानी म्हणाले की, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 मधील 16 जवानांना बाहेरगावी बंदोबस्त दरम्यान कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्यातील 15 जवान आता पूर्णपणे बरे झाले असून कर्तव्यावर आहेत, तर एक जवानावर उपचार सुरु आहे. पोलीस जवान शारिरीकरित्या फिट व त्यांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असल्यामुळे जवांनानी कोरोनावर मात केली आहे. देशावर कुठलेही संकट येवो, पोलीस जवान हा देश सेवेसाठी नेहमी तत्पर असतो. वर्षातील बारा महिन्यांपैकी नऊ महिने राखीव पोलीस बलाचा जवान हा कुटूंबापासून दूर असतो. कर्तव्य बजावत असताना त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होताना दिसून येतो. त्यांच्यातील ताणतणाव घालविण्यासाठी योगा, व्यायाम व ध्यानधारणाचे प्रशिक्षण नियमित दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वतः या सर्वांसह ध्यानधारणेत भाग घेतला. प्रशिक्षक शिवाजी कुचे यांनी यावेळी सकारात्मक विचार, साक्षीभावाचे महत्त्व व ध्यानसंगीत प्रात्यक्षिकातून ध्यानधारणेची अनुभूती सर्वांना दिली. पोलीस जवानांसह बलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सर्वच या प्रात्यक्षिकात मनापासून सहभागी झाले होते. ध्यान करताना साधली जाणारी एकाग्रता, अनुभवाला येणारी निरामय शांतता व ताण तणावाचे निरसन यातून आमचे मनोबल उंचावले. कोविड 19 आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत आम्ही बाहेर जिल्ह्यात बंदोबस्ताला गेलो होतो. या प्रशिक्षणाने मनोबल उंचावण्यासाठी मदत झाली. आम्ही पुन्हा देशसेवेसाठी नव्या दमाने सज्ज होत आहोत, असे जवानांनी यावेळी सांगितले.