स्थैर्य, मेढा, दि. ३० : साप्ताहिक ‘ पुणे प्रवाह’ यांच्या वतीने देण्यात येणार कोविड महायोद्धा पुरस्कार ‘प्रबोधन माध्यम न्यूज एजन्सी चे संस्थापक दीपक बीडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. ‘ पुणे प्रवाह’ चे संचालक संतोष सागवेकर यांनी ही माहिती दिली. दीपक बीडकर हे मुळचे जावळी तालुक्यातील रहिवासी आहेत.
वृत्त सेवा ही अत्यावश्यक सेवा असल्याने दीपक बीडकर यांनी कोरोना लॉकडाऊन काळात घरात न थांबता, नियम पाळून न्यूज एजन्सी मार्फत फिल्ड वर जाऊन जास्तीत जास्त बातम्या मिडिया साठी कव्हर केल्या. आझम मशीद ही कोविड क्वरांटाइन सेंटर साठी देण्याची जगातील पहिली घटना कव्हर करणे राष्ट्रवादी डॉक्टर सेलने घेतलेली कंटेनमेंट भागातील १० शिबिरे, जैन संघटनेची रुग्णवाहिका सेवा, डॉक्टर्सना ६ हजार शिल्ड देण्याचा उपक्रम, युवक क्रांती दल, गांधीभवन पासून विविध संघटनांच्या रेशन कीट वितरणाच्या बातम्या, कोरोना काळातील शैक्षणिक वेबिनार मिडियासाठी कव्हर करणे, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना मोफत वाहन दुरुस्ती सेवा देणाऱ्यांची बातमी देणे, कोरोना काळात गिरणी चालवून समाजसेवा करणाऱ्या तरुण वकिलाची कामगिरी सर्वांसमोर आणणे अशी माध्यम सेवा केली.
पत्रकारांसाठी पत्रकार संघाला २०० फेस शिल्ड देणे, फिल्डवर मदतकार्य करणाऱ्या पत्रकारांना हातमोजे देणे, गरजूंना रेशन कीट देणे, वृत्तपत्र विक्रेत्यांना रेशन कीट देणे, रंगभूमी सेवकांना मदत अशा अनेक उपक्रमात सहभाग घेतला. पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना कोविड लॉकडाऊन काळातील घडामोडींची सोशल मिडीयाच्या माध्यमातून अचूक माहिती दिली.
अनेक बाहेरगावी अडकलेल्या गरजूंची पुण्यात येण्या-जाण्यासाठी समन्वय करणे, केमो थेरपीसाठी कॅन्सर पेशंटला रुग्णालयात दाखल करणे, बिहार माहेर असलेल्या आणि पुण्यात सासर असलेल्या कौटुंबिक छळ होणाऱ्या मुलीची सुटका पोलिसांच्या मदतीने करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या अंत्य विधीला स्मशान भूमीत उपस्थित राहणे अशा शेकडो गोष्टी दीपक बीडकर यांनी कोरोना लॉकडाऊन काळात केल्या.
या पुरस्कारासाठी शहराच्या विविध भागांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते, असे संतोष सागवेकर यांनी सांगितले.