स्थैर्य, वाई, दि. १७ : कवठे, ता. वाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये प्रशासनाच्यावतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात तातडीने 30 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
कवठे आरोग्य केंद्रामध्ये योग्य त्या सुविधा पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत दिनांक 15 जुलै रोजी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, गट विकास अधिकारी उदय कुसुरकर यांनी आरोग्य केंद्राचे डॉ. विजय ठोंबरे व डॉ. गणेश पार्टे यांच्या उपस्थितीत आरोग्य केंद्रास भेट दिली. केंद्रात कोविड सेंटर सुरू करण्या संदर्भातील सर्व बाबींची पाहणी केली. तातडीने सर्व व्यवस्था करण्या संदर्भात संबंधित विभागांना सूचना दिल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्र, कवठे येथे नुकतीच प्रशस्त व अद्ययावत इमारत उभी करण्यात आली आहे. अंदाजे 2 कोटी रुपये किमतीचे हे पहिलेच भव्य दुमजली आरोग्य केंद्र आहे. यामध्ये प्रशस्त ऑपरेशन थिएटर, स्वतंत्र बेडरूम व प्रशस्त हॉल आहे. ही वास्तू कोरोनोच्या प्रादुर्भावामुळे उद्घाटनापासून वंचित राहिली व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन न होताच कोरोनाच्या रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आली.
16 जुलैपासून या केंद्रात रुग्ण दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येत आहे. यावेळी कवठे गावचे सरपंच श्रीकांत वीर, उपसरपंच संदीप डेरे, तलाठी, पोलीस पाटील व आपत्ती व्यवस्थापन समितीतील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कवठे येथील कोविड आरोग्य केंद्र हे वाई तालुक्याच्या ग्रामीण भागातील पहिलेच कोविड आरोग्य केंद्र ठरले आहे. या आरोग्य केंद्रामध्ये दररोजच्या ओ.पी.डी. साठी शंभरहून अधिक रुग्ण येत असल्याने व आता कोविड केंद्र सुरू झाल्याने या आरोग्य केंद्रात जाण्यासाठी इतर व्याधींच्या रुग्णांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या आरोग्य केंद्रात कोविड केंद्र सुरू झाल्याने इतर रुग्णांच्या संख्येत मात्र घट होणार आहे