
स्थैर्य, फलटण, दि. २२ सप्टेंबर : महसूल प्रशासनाचा कणा म्हणून काम करणाऱ्या कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कायम करावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल सेवक (कोतवाल) संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन संघटनेच्या फलटण तालुका शाखेने तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना सादर केले असून, शासन दरबारी मागण्या मान्य न झाल्यास आज, दि. २२ सप्टेंबर रोजी मुंडण आंदोलन व उद्या, दि. २३ सप्टेंबरपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोतवाल हा महसूल आणि प्रशासन यांमधील एक महत्त्वाचा दुवा आहे. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज, कर वसुली, दवंडी देणे, शासकीय टपाल वाटप, कार्यालयांची स्वच्छता अशा २४ तास स्वरूपाच्या जबाबदाऱ्या कोतवाल पार पाडत आहेत. मात्र, कामाच्या तुलनेत त्यांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे आहे. पोलीस पाटील (१९६७) आणि अंगणवाडी सेविका (१९९६) यांना सेवेत पदोन्नती व इतर लाभ मिळाले, परंतु कोतवाल आजही शासकीय लाभांपासून वंचित आहेत, अशी खंत संघटनेने व्यक्त केली आहे.
शासनाने आमच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे, असे संघटनेने स्पष्ट केले. या आंदोलनाचा भाग म्हणून आज, दि. २२ रोजी राज्यभरात मुंडण आंदोलन, तर दि. २३ सप्टेंबरपासून नागपूर येथे धरणे आंदोलनासह राज्यव्यापी लेखणीबंद आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. फलटण तालुक्यातील सर्व कोतवाल या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
हे निवेदन सादर करताना कोतवाल संघटनेचे फलटण तालुका अध्यक्ष राहुल काकडे, सचिव दादासो काळे, उपाध्यक्ष रिंकेश खराडे, सरचिटणीस पांडुरंग आडके यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य कोतवाल उपस्थित होते.