कोरेगावच्या पोलिस उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांचे निलंबन


 स्थैर्य, 15 मार्च, सातारा : कोरेगाव पोलिस ठाण्यातील महिलापोलिस उपनिरीक्षक श्रीमती दीपिका मुसळे यांचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी नुकतेच निलंबन केले आहे. निलंबनाच्या आदेशाची अंमलबजावणी आज करण्यात आल्याची माहिती कोरेगाव पोलिस ठाण्यातील सूत्रांनी दिली.कोरेगाव पोलिस ठाणे मागील सुमारे वर्षभरापासूनविविध कारणांनी चर्चेत आहे. पोलिस ठाण्याच्या कामकाजावर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. याप्रश्नी पोलिस ठाण्यावर मोर्चे, धरणे, ठिय्या आंदोलने झाली आहेत. या काळात कधी नव्हे ती कोरेगाव पोलिस ठाण्याची तब्बल तीन वेळा तपासणी झाली.
त्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनीलफुलारी व राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक नवल बजाज यांच्या तपासणीचा समावेश आहे. असे असताना आता पोलिस ठाण्यातील एकमेव महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीमती मुसळे यांचे निलंबन झाले आहे. श्रीमती मुसळे यांच्याकडे तपासासाठी असलेल्या अनेक गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहणे, वारंवार गैरहजर राहणे, वैद्यकीय रजेवर जाणे आदी अनेक कारणे नमूद करत कोरेगाव पोलिस ठाणे, कोरेगाव पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून कसुरी अहवाल आल्यामुळे पोलिस अधीक्षक श्री. दोशी यांनी पोलिस उपनिरीक्षक श्रीमती मुसळे यांना निलंबित केले आहे. या निलंबन आदेशाची अंमलबजावणी आज करण्यात आल्याची माहिती कोरेगाव पोलिस ठाण्यातील सूत्रांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!