दैनिक स्थैर्य । दि.०७ एप्रिल २०२२ । शिर्डी । कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीला मंजूरी दिली असून त्यासाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी केली.
कोपरगाव येथे पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर या इमारतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, खासदार सुजय विखे, आमदार आशुतोष काळे, आमदार किशोर दराडे, आमदार सुधीर तांबे, दुर्गा तांबे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री श्री. पवार म्हणाले, मागील दोन वर्षाच्या काळातील कोरोना संकटावर सर्वांच्या सहकार्याने मात केली असून, कोरोना संकट पुन्हा येऊ नये यासाठी शासन जागरुक आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा निर्मितीसाठी सुमारे 1 लाख 25 हजार कोटी रुपये तरतूदीचा पंचसूत्री कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. कोरोना संकटात आर्थिक अडचणींवर मात करुन विकास कामांसाठी मोठया प्रमाणावर शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.
राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अहमदनगर जिल्हा अग्रेसर आहे. या जिल्हयाच्या विकासामध्ये कर्मवीर शंकरराव काळे यांचे योगदान मोठे आहे. कर्मवीर शंकरराव काळे यांचा पूर्णाकृती पुतळा कोपरगावकरांना प्रेरणादायी ठरेल तसेच नागरिकांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.
कोपरगाव शहराच्या विकासासाठी नदी संवर्धन, रस्ते विकास तसेच बस स्थानक परिसरात बीओटी तत्वावर व्यापारी गाळे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. डासमुक्त आणि आरोग्याच्यादृष्टीने स्वच्छ कोपरगावसाठी भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव त्वरित सादर करण्याची सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला केली. येत्या महाराष्ट्र दिनी नागपूर-मुंबई बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचा पहिला टप्पा सुरु करण्याबाबत नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. कोपरगावच्या विकासासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या विकास कामांमुळे कोपरगावचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त् केला.
गृह मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, नागरिक केंद्रस्थानी ठेवून कोपरगाव शहराच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. विकास कामांच्या अंमलबजावणीसाठी दिर्घकालीन उपाययोजना निश्चित करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी, तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेद्वारे भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. कोरोना संकटावर मात करुन विकास कामांना मोठा निधी शासनाने दिला असून पंचायत समिती इमारतीसह अन्य वास्तूंचे बांधकाम उच्च दर्जाचे झाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकामध्ये आमदार आशुतोष काळे यांनी विकास कामांची माहिती सांगितली.