स्थैर्य, सातारा, दि. २७ : करोनाच्या काळात व्यवसाय, रोजगार बंद असल्याने करायचे काय, असा प्रश्न अनेक युवकांपुढे आहे. मात्र, असे असताना कोपर्डे हवेली, ता. कराड येथील युवकांनी सुळक्याच्या डोंगरावर दगडाने श्रीराम अक्षरे काढली आहेत. ही अक्षरे सुमारे सहा ते सात किलोमीटर अंतरातील गावातून दिसत असल्याने हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरला आहे.
कोपर्डे हवेली गावच्या हद्दीत सुळक्याचा डोंगर असून त्याची उंची सातशे ते आठशे फूट आहे. कोरोनाच्या काळात करायचे काय म्हणून सुळक्याच्या डोंगरावर दगड एकत्रित करून श्रीराम लिहायचे असे युवकांनी ठरवले. त्यांनी त्याची सुरुवात 13 मे रोजी केली आणि हे काम दि.24 जुलैला पूर्ण झाले. या अक्षरांची उंची 43 फूट असून लांबी 60 फूट आहे. खुदाई करून एक ते दीड फुटाचा पाया काढून त्यावर दगड रचले आहेत. दहा किलोपासून पन्नास किलोपर्यंतचे दगड गोळा करून ही अक्षरे काढली असून त्याला पांढरा रंग दिला आहे. समोर पंधरा फूट लोखंडी पाइपवर झेंडा लावला आहे. डोंगरावर दगडात साकारलेले श्रीराम आणि झेंडा मलकापूर येथील कृष्णा रुग्णालयासमोरील उड्डाण पुलावरून, घोणशी, वहागाव, बनवडी गावातून स्पष्टपणे दिसतो. याच ठिकाणी कोपर्डे हवेली येथील युवा मंचच्यावतीने दिलेल्या रोपांचे रोपण केले आहे. त्यात वड, पिंपळ, लिंब आदींसह इतर झाडांचा सामावेश आहे.