दैनिक स्थैर्य । दि.२८ मार्च २०२२ । सिंधुदुर्गनगरी । जगातील पर्यटन कोकणात आणू, यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. देवगडवासियांसाठी कचरा निर्मूलनाबाबत आणि लवकरच पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे. संपूर्ण कोकणात प्रत्येक किलोमीटरला मोबाईल नेटवर्कची चांगली कनेक्टव्हीटी आणि पायाभूत सुविधा मजबूत करणार, अशी ग्वाही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
देवगड-जमसंडे नगरपंचायतीमध्ये २ कोटी २२ लाख ६५ हजार रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आज पर्यटन मंत्री श्री ठाकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष साक्षी प्रभू, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, अरुण दूधवाडकर, संदेश पारकर, सतीश सावंत, संजय पडते आदी उपस्थित होते.
पर्यटन मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कोकणातील जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद घेवून कोकणाचा शाश्वत विकास करण्याच्यादृष्टीने आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी नगरपंचायतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू. पर्यावरण मंत्री आणि कोकणाचा नातू म्हणून कचरा निर्मूलनाबाबत आणि पाणी पुरवठा लवकरच सुरु करण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे.
प्रत्येक किलोमीटरला मोबाईल नेटवर्क येवून, चांगली कनेक्टीव्हीटी मिळण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी मोबाईल कंपन्यांना पत्रे द्यावीत. जगातील पर्यटन कोकणात येईल, आणि आनंद देईल, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, देवगडवासियांना नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 57 कोटीचा निधी येत्या काही दिवसात मिळेल. शाश्वत विकास करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. केवळ घोषणा न करता 2 कोटी 22 लाख 65 हजारच्या विकास कामांचा प्रत्यक्ष शुभारंभ करत आहोत, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्यास, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. तसेच श्री ठाकरे यांच्या हस्ते कोनशिला अनावरणही करण्यात आले.
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, स्वामी समर्थ आणि गुरुमाऊली स्वयं सहायता बचत गटांचा यावेळी पर्यटन मंत्री श्री ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.