
कोळकीत स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारण्यात आली आहे. वायफायसह अत्याधुनिक सुविधा असून लवकरच उद्घाटन होणार असल्याची माहिती जयकुमार शिंदे यांनी दिली.
स्थैर्य, फलटण, दि. ०२ जानेवारी : कोळकी (ता. फलटण) आणि पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी हक्काचे आणि शांत ठिकाण मिळावे, यासाठी गावात सुसज्ज अभ्यासिका (Study Center) उभारण्यात आली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे दालन उभे राहिले असून, लवकरच याचा लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून या अभ्यासिकेत अद्ययावत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. यामध्ये मोफत वाय-फाय (WiFi), संगणक (Computer), शुद्ध पिण्यासाठी वॉटर प्युरिफायर आणि सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कोळकीसह परिसरातील यूपीएससी, एमपीएससी आणि इतर शासकीय परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे दालन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या उपक्रमाविषयी माहिती देताना जयकुमार शिंदे म्हणाले, “गावातील तरुणांनी या सुविधेचा लाभ घेऊन अभ्यासात प्रगती करावी. या माध्यमातून गावातून चांगले प्रशासकीय अधिकारी घडावेत आणि भविष्यात गावाच्या विकासात त्यांचे योगदान लाभावे, हाच यामागील मुख्य उद्देश आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते लवकरच या वास्तूचे उद्घाटन करण्यात येईल.”
अभ्यासिकेचे काम पूर्ण झाले असून, लवकरच ती विद्यार्थ्यांच्या सेवेत रुजू होणार आहे. तरी कोळकी आणि परिसरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जयकुमार शिंदे आणि मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

