
कोळकी सरपंच अपर्णा पखाले यांचा विरोधकांना सडेतोड जबाब; म्हणाल्या, “पुरावे असतील तर तक्रार करा, विकासकामे खुपत असल्यानेच बिनबुडाचे आरोप.”
स्थैर्य, फलटण, दि. 27 डिसेंबर : कोळकी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सरपंचांनी काढता पाय घेतल्याच्या आरोपांचे सरपंच सौ. अपर्णा विक्रम पखाले यांनी जोरदार खंडन केले आहे. “कालची ग्रामसभा ही ‘विशेष ग्रामसभा’ होती. अजेंड्यावरील सर्व विषयांची पूर्तता झाल्यानंतरच मी सभागृहातून बाहेर पडले. ऐनवेळच्या विषयाला विशेष ग्रामसभेत परवानगी नसते, याचे भान विरोधकांनी ठेवावे,” असा खुलासा सरपंच अपर्णा पखाले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
मंदिराच्या विषयावर राजकारण नको
मालोजीनगर येथील मारुती मंदिर जीर्णोद्धाराच्या विषयावर बोलताना सरपंच म्हणाल्या की, या कामात ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी काही तांत्रिक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या, त्यामुळे हे काम प्रलंबित आहे. याबाबत ग्रामविस्तार अधिकाऱ्यांकडून लेखी अहवाल मागवला असून, लवकरच हे काम मार्गी लागेल. मंदिर हा गावाच्या अस्मितेचा विषय आहे, मात्र विरोधक यातही राजकारण आणून ग्रामस्थांची दिशाभूल करत आहेत.
पुरावे असतील तर तक्रार करा
विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आणि मर्जीतल्या ठेकेदारांना कामे दिल्याचा आरोपांचा समाचार घेताना पखाले म्हणाल्या, “विरोधकांकडे जर भ्रष्टाचाराचे सबळ पुरावे असतील, तर त्यांनी बिनदिक्कत तक्रार करावी. त्याला कायदेशीर उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. गावात सध्या सुरू असलेली कोट्यवधी रुपयांची विकासकामे विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहेत. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत आपला पराभव अटळ असल्याचे दिसल्यानेच ते असे बिनबुडाचे आरोप करत आहेत.”
सदस्यांनी मासिक सभेत प्रश्न विचारावेत
ग्रामसभेत गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सुनावताना सरपंच म्हणाल्या की, ग्रामसभा ही सामान्य ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी असते. ग्रामपंचायतीच्या सदस्यांना प्रश्न विचारायचे असतील, तर त्यांनी ते मासिक सर्वसाधारण सभेत विचारावेत. ग्रामसभेत प्रश्न विचारून मुद्दाम गोंधळ घालणे, हे केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येते.
