विजेच्या स्मार्ट मीटर सक्तीविरोधात कोळकी ग्रामस्थ आक्रमक; आंदोलनाचा इशारा

पूर्वसूचना न देता मीटर बसवल्याने आणि वाढीव बिले येत असल्याने नागरिकांचा संताप


स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑगस्ट : फलटण शहरालगत असलेल्या कोळकी उपनगरात वीज वितरण कंपनीकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता सक्तीने स्मार्ट मीटर बसवले जात असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज, दि. ६ ऑगस्ट रोजी फलटण येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन आपला तीव्र रोष व्यक्त केला आहे.

वीज वितरण कंपनीने जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवल्यामुळे वीज बिलांमध्ये मोठी वाढ झाली आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आधीच नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट असताना, या वाढीव बिलांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. या समस्येबाबत नागरिकांनी भाजप पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांसोबत बैठक घेऊन आपली तक्रार मांडली आहे.

स्मार्ट मीटर बसवण्याचे काम त्वरित थांबवून नागरिकांना योग्य दराने वीज बिले आकारण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, वीज वितरण कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जयकुमार शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, कामगार नेते पै. बाळासाहेब काशिद, पै. संजय देशमुख, संदीप नेवसे, उदयसिंह निंबाळकर यांच्यासह कोळकी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!