
दैनिक स्थैर्य | दि. 21 डिसेंबर 2024 | कोळकी | कोळकी ग्रामपंचातीचे माजी सदस्य, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी समजले जाणारे तथा युवा नेते उदयसिंह उर्फ बबलू निंबाळकर यांच्यासह कोळकी गावातील अनेकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. कोळकीमधील युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याने कोळकी गावामध्ये राजे गटाला खिंडार पडले असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. कोळकीच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही अशी ग्वाही सुद्धा यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.
मागील ग्रामपंचायत निवडणुकीत बबलू निंबाळकर यांना राजे गटाने तिकीट दिले नव्हते. तरी सुद्धा बबलू निंबाळकर यांनी त्यांच्या मातोश्री यांना अपक्ष म्हणून निवडून आणले होते. त्यानंतर पुन्हा बबलू निंबाळकर हे राजे गटामध्ये सक्रिय झाले होते यासोबतच राजे गटाच्या कोळकी गावच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका सुद्धा ते नेहमीच बजावत होते.
बबलू निंबाळकर यांच्यासमवेत कोळकीचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजन खिलारे, निरंजन निंबाळकर यांनी भारतीय जनता पक्षात पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, बाळासाहेब काशिद, रणजितसिंह भोसले, रणजीत जाधव, मंगेश नाळे, उपस्थित होते.