कोळकीत राजे गटाला धक्का; ॲड. सागर सस्ते यांचा भाजपमध्ये प्रवेश


नगरपरिषद निकालाआधीच कोळकीत राजकीय भूकंप; विधितज्ज्ञ सागर सस्ते यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत हाती घेतले कमळ.

स्थैर्य, फलटण, दि. २० डिसेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच कोळकी येथे राजे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. कोळकीतील प्रमुख कार्यकर्ते आणि शहरातील नामांकित विधितज्ज्ञ ॲड. सागर सस्ते यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपताच भाजपमध्ये इनकमिंगचा वेग पुन्हा वाढला आहे. कोळकी गावात राजे गटाची ताकद मानले जाणारे आणि कायदेतज्ज्ञ म्हणून ओळख असलेले ॲड. सागर सस्ते यांनी भाजपचा रस्ता धरल्याने राजे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आगामी जिल्हा परिषद आणि कोळकी ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने सागर सस्ते यांचा प्रवेश भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे.

पक्षात प्रवेश करताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सस्ते यांचे स्वागत केले. ते म्हणाले,

“ॲड. सागर सस्ते यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील. त्यांना भविष्यात राजकीय आणि सामाजिक ताकद देण्याचे काम आम्ही करू.”

या पक्षप्रवेश सोहळ्याला ॲड. सचिन शिंदे, सागर शहा, अमित रणवरे, तेजसिंह भोसले, मयुर देशपांडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. निकालापूर्वीच झालेल्या या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.


Back to top button
Don`t copy text!