
स्थैर्य, कोळकी दि.9 : फलटण शहरा शेजारील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून कोळकीकडे बघितले जाते. आतापर्यंत कोळकी ग्रामपंचायतीवर राजे गटाचे एकहाती वर्चस्व राहिलेले आहे. आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टीला कोळकी ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करण्याची संधी दिल्यास कोळकीचे सिंगापूर नाही पण सुनियोजित शहर नक्कीच करुन दाखवू, असा विश्वास व्यक्त करुन कोळकी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार धर्मराज देशपांडे व प्रभाग क्रमांक 4 मधून स्वप्नाली पंडीत यांच्यासह भाजपच्या सर्व अधिकृत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहनही माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोळकी वासियांना केले.
कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप पुरस्कृत श्रीराम पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ मालोजीनगर येथील हनुमानमंदीरात श्रीफळ वाढवून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते.
कोळकी ग्रामस्थांनी एकदा निवडणूक प्रक्रिया हातात घेतल्यावर समोरचा शत्रू कितीही मोठा असला तरी तो पराभूत होवू शकतो हा इतिहास कोळकी वासियांचा आहे. कोळकीमधून लोकसभेला मला जे मताधिक्य मिळालेले होते त्यावेळी कोळकीमधील लोक काही बोलत नव्हते परंतू मतांमधून कोळकीच्या ग्रामस्थांनी ते दाखवून दिले. असाच विश्वास पुन्हा एकदा कोळकी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये मतदारांनी दाखवून द्यावा, असेही आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.