
विकासकामांवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; मंदिरांची कामे अडवल्याचा विकास नाळे, संजय देशमुख आणि संदीप नेवसे यांचा गंभीर आरोप.
स्थैर्य, फलटण, दि. 27 डिसेंबर : फलटण शहराचे महत्त्वाचे उपनगर असलेल्या कोळकी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत आज अजब प्रकार पाहायला मिळाला. विकासकामांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी प्रश्नांचा भडीमार सुरू करताच ग्रामसभेचे अध्यक्ष अर्थात सरपंचांनी भरसभेतून काढता पाय घेतला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याने ग्रामसभेचे वातावरण चांगलेच तापले होते.
हितसंबंधांतून विकासकामे होत असल्याचा आरोप
ग्रामसभेत कोळकी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विकास नाळे, युवा नेते संजय देशमुख आणि संदीप नेवसे यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर सडकून टीका केली. त्यांनी आरोप केला की, गावात सध्या सुरू असलेली विकासकामे ही केवळ सत्ताधारी सदस्य आणि त्यांचे हितसंबंध असलेल्या भागातच केली जात आहेत. सर्वसामान्यांच्या वस्त्यांमध्ये आणि गरजेच्या ठिकाणी कामे रखडवली जात असून, विकासकामांत दुजाभाव केला जात आहे.
मंदिरांची कामे अडवल्याचा गंभीर आरोप
यावेळी बोलताना विरोधकांनी आणखी एक गंभीर आरोप केला. गावातील धार्मिक भावनांशी निगडीत असलेल्या मंदिरांची कामे सत्ताधारी सदस्य आणि सरपंच जाणीवपूर्वक अडवत आहेत. विकासकामांना मंजुरी असूनही केवळ राजकीय द्वेषापोटी किंवा मर्जीतील ठेकेदारांसाठी ही कामे प्रलंबित ठेवली जात असल्याचे विकास नाळे, संजय देशमुख आणि संदीप नेवसे यांनी म्हटले आहे.
सरपंचांचा काढता पाय
विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाला. प्रश्नांची सरबत्ती आणि आरोपांच्या गदारोळात उत्तरे देण्याऐवजी सरपंचांनी थेट सभेतून निघून जाणे पसंत केले. सरपंचांनी अशा प्रकारे काढता पाय घेतल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.

