पर्यावरण रक्षणासाठी कोळकी ग्रामपंचायतीचा पुढाकार; ‘श्रीं’च्या मूर्ती आणि निर्माल्य दानाचे आवाहन

मुख्य कार्यकारी अधिकारी यशस्वी नागराजन यांच्या संकल्पनेतून गावपातळीवर अंमलबजावणी; कृत्रिम तलावाची निर्मिती


स्थैर्य, कोळकी, दि. ३ सप्टेंबर : सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती यशस्वी नागराजन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, कोळकी ग्रामपंचायतीने यंदाचा गणेशोत्सव संपूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवामुळे होणारे जल, ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. विजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रामपंचायतीने सार्वजनिक गणेश मंडळे, महिला बचत गट, तरुण मंडळे आणि शासकीय कर्मचारी यांची संयुक्त सभा घेऊन हा निर्णय घेतला. या उपक्रमाची जनजागृती करण्यासाठी गावात फ्लेक्स, गृहभेटी आणि घंटागाडीद्वारे घोषणा देऊन प्रसिद्धी केली जात आहे.

ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेले नियोजन:

  • कृत्रिम तलाव: ग्रामपंचायतीने मूर्ती विसर्जनासाठी गावात स्वतंत्र कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे.
  • निर्माल्य संकलन: विसर्जनाच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी घंटागाडीची सोय करून निर्माल्य संकलित केले जाणार आहे.
  • घरगुती मूर्ती संकलन: घरात विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती गोळा करण्यासाठी स्वतंत्र ट्रॅक्टर-ट्रॉलीची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • दान केलेल्या मूर्ती: संकलित झालेल्या सर्व मूर्ती विधिवत पूजेने कुंभार समाजाकडे सोपविण्यात येणार आहेत.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच सौ. अपर्णा पखाले, उपसरपंच डॉ. अशोक नाळे आणि सर्व सदस्य कार्यरत आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी श्री. रमेश साळुंखे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!