
कोळकी ग्रामसभेत कर्मचाऱ्यांना अरेरावी आणि दमदाटी झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेने काम बंदचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे, ‘हा आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे,’ असा पलटवार राजन खिलारे यांनी केला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०२ जानेवारी : कोळकी (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत कर्मचाऱ्यांना एकेरी भाषेत बोलून दमदाटी केल्याप्रकरणी वातावरण तापले आहे. या घटनेचा निषेध करत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीवर कारवाई झाल्याशिवाय ग्रामपंचायतीचे कामकाज न करण्याचा पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे, ज्यांच्यावर आरोप झाले आहेत ते राजन खिलारे यांनी “अन्यायाविरोधात आपला लढा सुरूच राहील,” अशी भूमिका मांडली आहे.
ग्रामसभेत काय घडले?
कामगार सेनेने गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी कोळकी ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली. या सभेत राजन रामचंद्र खिलारे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उद्देशून एकेरी भाषा वापरली तसेच दडपशाही आणि दमदाटी केली. विशेष म्हणजे, कर्मचारी हे प्रशासनाचा भाग असूनही, यावेळी उपस्थित सरपंच आणि सदस्यांनी कर्मचाऱ्यांची बाजू घेतली नाही किंवा संबंधिताला रोखले नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जीवितास धोका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. स्थानिक प्रशासनाने आणि पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. जोपर्यंत राजन खिलारे यांच्यावर तक्रार दाखल होऊन कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत कोळकी ग्रामपंचायतीचे कर्मचारी कोणतेही काम करणार नाहीत, असा इशारा संघटनेने दिला आहे.
“माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न” : राजन खिलारे
या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया देताना कोळकी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष राजन खिलारे यांनी शायरीच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल मै है, देखणा है जोर कितना बाजुये कातिल मै है.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “माझा आवाज दाबण्याचा हा चांगला प्रयत्न आहे, पण माझा आवाज दबणार नाही. अन्यायाच्या विरोधात मी सतत लढत राहणार.”
निवेदनावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, त्याच्या प्रती सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार आणि फलटण शहर पोलीस ठाण्याला देण्यात आल्या आहेत.

