
कोळकी गावचे युवा नेते अनुप गायकवाड यांनी आमदार सचिन पाटील व शिवरूपराजे खर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली राजे गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
स्थैर्य, कोळकी, दि. २४ जानेवारी : कोळकी गावातील राजे गटाचे नेते, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू सहकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व ग्रामपंचायतीचे बंडखोर सदस्य अक्षय गायकवाड यांचे बंधू तसेच युवा नेते अनुप शामराव गायकवाड यांनी राजे गटाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश आमदार सचिन पाटील व शिवरूपराजे खर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
कोळकी येथे झालेल्या कार्यक्रमात अनुप गायकवाड यांनी राजे गटातून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी राजे गटात अपेक्षित विकासकामे होत नसल्याने कार्यकर्त्यांची वारंवार कुचंबणा होत असल्याचा आरोप केला.
अनुप गायकवाड म्हणाले की, राजे गटात राहून काम करताना कार्यकर्त्यांना योग्य सन्मान व संधी मिळत नसल्याची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे आपण राजकीय निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यापुढे फलटण तालुक्यात महायुतीचे प्रमुख माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील तसेच शिवरूपराजे खर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणार असल्याचे अनुप गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी आमदार सचिन पाटील यांनी अनुप गायकवाड यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करत, “अनुप गायकवाड यांना पक्षात सन्मानजनक स्थान देण्यात येईल आणि त्यांच्या माध्यमातून कोळकी परिसरात संघटन मजबूत केले जाईल,” असे मत व्यक्त केले.
या प्रवेशामुळे कोळकी परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असून, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.

