स्थैर्य, कोल्हापूर,दि.२४: लाॅकडाउननंतर सहा महिन्यांनी कोल्हापूरच्या प्रमुख रस्त्यांवरून वरात दिसली… घोडेस्वार… भालदार,चोपदार..वऱ्हाडी आणि रुखवत वाजत गाजत चालला होता. पण, हा कुठला लग्नाचा रुखवत आणि वरात नव्हतीच ही तर महानगरपालिकेकडून शहरात सुरू असलेल्या अमृत पाइपलाइन योजनेतील भोंगळ कारभाराविरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांनी काढलेली वरात होती. रुखवतात मनसेच्या कार्यकर्त्यांनी चक्क वाळू, खडी, सिमेंट दिले.
कोल्हापूर महानगरपालिकेने अमृत पाइपलाइन योजनेचे ११५ कोटी रुपयांचे काम ‘दास’ या खासगी कंपनीला दिले आहे. पावसाळ्यापूर्वी या कंपनीने कोल्हापुरात काम सुरू केले. याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पंचनामा करण्यात आला. ज्या पद्धतीने कामाचे टेंडर भरण्यात आले, त्या पद्धतीने काम झाले नसल्याचे निदर्शनास आले. पुराव्यासह याची माहिती मनसेने आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांना दिली होती. चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामाला स्थगिती द्यावी व कामाची चौकशी करावी, अशी मागणी मनसेने केली होती. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आज मनसेकडून महापालिकेवर वरात काढण्यात आली.
यावेळी कंपनीच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. येत्या काही दिवसात याचा खुलासा झाला नाहीतर महापालिकेला टाळे ठोकल्या शिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा मनसेने दिला. या आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.