
स्थैर्य, कोल्हापूर, दि. १८ ऑगस्ट : राज्याच्या दुर्गम भागातील सर्वसामान्य पक्षकारांना समानतेचे न्यायदान करण्यासाठी कोल्हापूर सर्किट बेंचची निर्मिती होत असून, हे बेंच गोरगरिबांसाठी सामाजिक आणि आर्थिक न्यायाचा मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी, सर्किट बेंचचे लवकरच कायमस्वरूपी खंडपीठात रूपांतर होईल, यासाठी उच्च न्यायालयाने तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन केले. “मागील ४३ वर्षांच्या लढ्यात मी २५ वर्षांपासून सहभागी आहे. न्यायव्यवस्थेचे विकेंद्रीकरण व्हावे, हा माझा नेहमीच आग्रह राहिला आहे. आज तो शब्द पूर्ण होत असल्याचा, सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याइतकाच आनंद होत आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सरन्यायाधीश गवई हेच बेंचचे शिल्पकार – मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात, या बेंचचे खरे शिल्पकार सरन्यायाधीश भूषण गवई हेच असल्याचे सांगितले. “त्यांनीच या प्रक्रियेला गती दिली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच आजचा ऐतिहासिक क्षण शक्य झाला आहे,” असे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खंडपीठाच्या नवीन इमारतीसाठी शेंडा पार्क येथील ६८ कोटी रुपयांची २५ एकर जमीन उच्च न्यायालयाला हस्तांतरित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
सामाजिक न्यायाचे वर्तुळ पूर्ण – उपमुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीत सर्किट बेंच स्थापन झाल्याने सामाजिक न्यायाचे वर्तुळ पूर्ण होत असल्याची भावना व्यक्त केली.
या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, विविध न्यायमूर्ती, वकील आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विजयराव पाटील यांनी मानले.