स्थैर्य, कोळकी दि. १२ : आत्ताच्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत कोळकीच्या मतदानाच्या आकडेवारीवरुन हे सिद्ध झाले आहे की, कोळकीतली जनता बोलत नाहीत पण करुन दाखवते. कोळकी ग्रामस्थांच्यात सत्ताधार्यांप्रती प्रचंड असंतोष आहे. राजे गटाची अनेक वर्षे सत्ता असतानाही या ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर आहे. कोळकीची दशा ‘अनियोजित शहर’ अशी झालेली आहे. कुठलेही गाव असले की त्या गावाला स्वतंत्र स्मशानभूमी ही असतेच. मात्र स्मशानभूमीसाठी आंदोलन करावं लागणारं कोळकी हे आशिया खंडातील पहिलंच गाव असेल, अशी उपरोधीक टिका ही यावेळी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोळकी मधील सत्ताधार्यांवर केली.
कोळकी (ता.फलटण) ग्रामपंचायत निवडणूकीतील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत श्रीराम पॅनेलचे प्रभाग क्रमांक ३ मधून धर्मराज देशपांडे, सौ. प्रियांका हिंगसे, सौ. कोमल जाधव व प्रभाग क्रमांक ४ मधून स्वप्नाली पंडित व गोरख जाधव या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मालोजीनगर येथील हनुमान मंदीतरा श्रीफळ वाढवून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे, स्वागत काशिद, बाळासाहेब काशिद यांची उपस्थिती होती.
खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, गेली अनेक वर्षे कोळकीवर राजे गटाची सत्ता आहे. पण या ठिकाणी अद्याप पिण्याच्या पाण्याचा मुलभूत प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही. राजे मंडळींनी कोळकीकरांची आजवर मोठी फसवणूक करण्याचे काम केले आहे, अशी टिका माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारादरम्यान केली.
निवडणूका या वारंवार होत असतात. परंतू लोकांनी विकासाला महत्त्व दिले पाहिजे. जो पर्यंत या ठिकाणचा स्थानिक पेटून उठणार नाहीत तो पर्यंत बदल घडणार नाही. ही निवडणूक तुमच्या विकासासाठी आहे हे लक्षात घेवून ग्रामपंचायतीच्या सत्तेत बदल घडवून आणावा. सत्ता भारतीय जनता पार्टीने पुस्कृत केलेल्या पॅनेलच्या हाती द्या; विकासाच्या कामात आम्ही कुणीही कुठेच कमी पडणार नाही, अशी ग्वाही यावेळी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
यावेळी भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह कोळकी ग्रामस्थ उपस्थित होते.