दैनिक स्थैर्य | दि. १९ एप्रिल २०२३ | फलटण |
सध्या देशासह राज्यात वातावरणात प्रचंड उष्णता वाढली आहे. या उष्णतेमुळे गेल्या काही दिवसांत उष्माघाताने अनेक लोकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे जनतेने या उष्माघातापासून स्वत:ला वाचविले पाहिजे, असे आवाहन फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.
उष्माघातासंदर्भात बोलताना डॉ. जगताप म्हणाले की, सध्या हवेत प्रचंड उष्णता वाढल्यामुळे शेतमजूर, कडक उन्हात फिरणारे लोक, उन्हात एका ठिकाणी काम करणार्या लोकांना शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन उष्माघात होत आहे. त्यामुळे काहींचा उष्माघातामुळे जीवही जात आहे. हा उष्माघात जीवघेणा ठरत असल्याने नागरिकांनी याची वेळीच लक्षणे जाणून घेऊन उपचार केले पाहिजेत.
उष्माघाताची लक्षणे अशी –
- प्रचंड थकवा येणे
- वारंवार तहान लागणे
- डोके दुखणे
- अस्वस्थ वाटणे
- जीभ कोरडी पडणे
- रक्तदाब कमी होणे
- हृदयाची धडधड होणे
- चक्कर येऊन बेशुद्ध पडणे
उष्माघातापासून वाचण्यासाठी नागरिकांनी पुढील उपाय करावेत –
- प्रखर उन्हात जाणे टाळावे
- पाण्याची बाटली सोबत ठेवावी
- जास्त पाणी प्यावे
- कोल्ड्रिंक्स ऐवजी लिंबूपाणी प्यावे
- अंगावर सुती कपडे वापरावीत
- उन्हात जाताना छत्रीचा वापर करावा
नागरिकांनी, शेतकर्यांनी भर दुपारी उन्हात काम करण्यापेक्षा सकाळी व संध्याकाळी कामे करावीत व उष्माघातापासून स्वत:ला वाचवावे, असे आवाहन फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी केले आहे.