दैनिक स्थैर्य । दि. २६ एप्रिल २०२२ । वाई । वाईचे आमदार मकरंद पाटील व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि आमदार बंधू नितीनकाका पाटील यांनी किसन वीर कारखान्याला कोठेही कर्ज मिळवू नये याची तजवीज करून कारखान्याची आर्थिक कोंडी केली आहे. आता हेच किसनवीर कारखाना वाचवण्याच्या गप्पा करत आहेत. त्यांचा हा दुटप्पीपणा कारखान्याच्या 52000 सभासद शेतकर्यांना ठाऊक आहे. जे स्वतः जिंकलेला खंडाळा कारखाना गेल्या पाच महिन्यात सुरू करू शकले नाहीत ते किसन वीर चे शिवधनुष्य कसे पेलणार यांनी आपल्या सहकारी संस्था कशा चालल्यात याचा पहिला हिशोब द्यावा, असा जोरदार टोला मदन भोसले यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या तीन मे रोजी होत आहे. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल या निवडणुकीत सहभागी झाले आहे या पॅनलची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आमदार मदन भोसले यांनी सोमवारी सातार्यात पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, ज्यांनी सातार्यात आमच्या विरोधात पत्रकार परिषदेत घेतली ते विरोधक म्हणजे गोमुख नव्हेत. शेतकर्यांचे पाठबळ आमच्या पाठीशी असून शेतकर्यांची देणी, कारखान्यावरील कर्ज, इतर काही देणे या सर्व जबाबदारी पासून आमचे पॅनेल कोठेही पळून जात नाही. उलट ते आव्हान पेलण्यासाठी आम्ही यंदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. 2003 झाली जेव्हा कारखाना आमच्याकडे आला तेव्हा 19000 सभासद होते. कारखान्याची गाळप क्षमता आम्ही पाच हजार मेट्रिक टन पर्यंत वाढवली एक लाख टन उत्पादन करणारी डिस्टिलरी, 22 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प, 80 हजार लिटर इथेनॉल निर्माण करणारे युनिट, 50 मेट्रिक टनाचे सीएनजी युनिट, इतके सगळे उपक्रम आम्ही राबवत असताना केवळ सहकाराला मदत व्हावी म्हणून प्रतापगड आणि खंडाळा कारखान्याला आम्ही मदतीचा हात पुढे केला याची असूया म्हणा अथवा राजकीय विद्वेष म्हणा विरोधकांनी किसनवीर कारखान्याला कोठेही कर्ज मिळू नये याची पुरती तजवीज केली. राज्य सहकारी बँकेने आम्हाला मदतीची हमी दिलेली असताना यांनीच कारस्थाने करून बँकेकडून कर्ज मिळू नये याचे कारस्थान केल्याचे ढीगभर पुरावे आमच्याकडे आहेत. आपले आई-वडील यांचा आपण आदरार्थी उल्लेख करतो विरोधकांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत आमचा बाप काढला, आम्ही कधीही आमच्याकडून टीकेची पातळी सोडली नव्हती. आमचा बाप हा खरोखर कर्तुत्ववान बाप होता. म्हणूनच यांचे परमपूज्य वडील आमच्या वडिलांसोबत होते किसनवीर ची आर्थिक कोंडी करण्यामध्ये आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे बंधू नितीन पाटील यांनी पुढाकार घेत मला कोठेही कर्ज मिळणार नाही याची तजवीज केली. त्यामुळेच हा प्रश्न आम्हाला केंद्र सरकारकडे न्यावा लागला.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकार मंत्री या नात्याने सहकार वाचवण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवी होती, मात्र त्यांनी सहकाराच्या विविध कलमांचा वापर करत किसनवीर सहकारी साखर कारखान्याची चौकशी लावली. त्यांचा हा असहकार आमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचा आहे खंडाळा कारखाना यांना आमच्या ताब्यातून हिसकावून याची घाई झाली होती. त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या हातातून घेतला येथील मतदारांचा कौल आम्ही मान्य केला. मात्र, पाच-सहा महिने उलटले तरी सुद्धा अजून येथील कारखाना सुरू झाला नाही. जर ते हा कारखाना सुरू करू शकणार नसतील तर मग किसनवीरचा कारभार ते कोणत्या पद्धतीने चालवणार आहेत. खंडाळा कारखानाही त्यांच्या नेतृत्वाची लिटमस टेस्ट होती आणि त्यामध्ये ते नापास झाले आहेत. त्यांचे कर्तृत्व 52 हजार शेतकर्यांना चांगलेच ठाऊक आहेत. म्हणूनच गेल्या 18 वर्षापासून हा कारखाना त्यांनी मदन भोसले यांच्या हातात सोपवलेले आहे. हीच राजकीय असूया असल्याने प्रतापगड आणि खंडाळा कारखान्याच्या वाटचालीमध्ये यांनी वारंवार राजकीय अडथळे निर्माण केले. केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शहा यांच्याकडे आम्ही हा प्रश्न नेल्यानंतर त्यांनी कारखान्याच्या करता संदर्भात एनसीडीसी योजनेअंतर्गत मदत करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या पै-पैचा हिशोब दिला जाईल ही जबाबदारी आम्ही नाकारत नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग बँकेने किसनवीर सहकारी साखर कारखान्याला यंदाचा हंगाम सुरू होईल इतपत आर्थिक मदत केल्याने आम्ही एप्रिल महिन्यामध्ये कारखाना सुरू केला आहे, असे मदन भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वाई तालुक्यांमध्ये स्वतःच्या नावावर असलेल्या सहकारी संस्था नीट चालवा उगाच किसनवीर च्या नावाखाली सहकाराचे क्षेत्र बदनाम करू नका. जर कारखान्यात भ्रष्टाचार करून जर मी संपत्ती कमावली असेल तर मी माझी संपत्ती पाटील बंधूंना द्यायला तयार आहे, त्यांनी त्यांची संपत्ती मला देण्याची तयारी ठेवावी, असा उपरोधिक टोला मदन भोसले यांनी पाटील बंधूंना लगावला. बावधन च्या सूतगिरणीचे सुद्धा मदन भोसले यांनी उदाहरण दिले. बावधनचे सूत गिरणी चांगली चाललेली कोणामुळे बंद पडली. यांच्या कुटुंबियातील दोघे ते तिघे तिथे आजही संचालक मंडळावर आहेत, ही सूतगिरणी कागदावर सहकार तत्त्वावर असली तरी प्रत्यक्षात खाजगी तत्त्वावर चालवली जात आहे. यांच्या संचालक मंडळातील सहकाराचा गाढा अनुभव असलेल्या बाबासाहेब कदम यांना बोलवावे कदम यांना काही शंका असल्यास त्यांनी आमच्याशी चर्चा करावी त्यांच्या शंकांना मी उत्तर द्यायला तयार आहे. किमान त्यांच्या सहकाराचा अनुभव तरी विरोधकांनी करून घ्यावा पण मदन भोसले यांच्या राजकीय द्वेषापोटी किसन वीरची आरती कोणी करून शेतकर्यांच्या भविष्याशी खेळू नये असे आवाहन मदन भोसले यांनी केले.
विरोधक नेहमीच किसनवीर कारखान्यावर साडेसातशे ते हजार कोटीचे कर्ज असल्याचा कांगावा करत आहेत. प्रत्यक्षात ते कर्ज तेवढे नाही. विरोधकांनी किसन वीरचे कर्ज कसे फेडणार हे तपशीलवार सांगावे. एकीकडे म्हणायचे की कारखान्याची बॅलन्स शीट नीट नाही, त्यांना कोणतीही बँक कर्ज देणार नाही मग असे असताना किसनवीर निवडणूक लढवण्याचा अट्टाहास कशासाठी? लोकशाहीमध्ये कोणीही निवडणूक लढवू शकतो पण शेतकर्यांची देणी आणि सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी पाटील बंधूंची आहे काय असा सवाल मदन भोसले यांनी केला. कारखाना चालवण्याची क्षमता आणि नियत ही तुमच्यामध्ये पहिल्यापासूनच नव्हती आणि इथून पुढेही नसणार आहे. मदन भोसले कारखान्याच्या राजकारणात अडकले तरच आपली आमदारकी सुरक्षित राहील, असा काही जणांचा अट्टाहास आहे, मात्र, पाच तालुक्यांची कार्यक्षेत्र असणार्या किसनवीरच्या सभासदांची हेळसांड करू नका आणि कारखान्याची बदनामी करू नका की इतकी तरी राजकीय सुचिता पाळा असेही आवाज मदन भोसले यांनी केले.
विरोधक केवळ दिशाभूल करून सहकार विभागाकडे वारंवार तक्रारी करत आहेत. किसनवीर कारखान्यावर सध्यातरी वाईट परिस्थिती आली असली तरी यातून नक्कीच शेतकरी विकास पॅनल मार्ग काढेल सहा तालुक्यातील 52 हजार सभासद हे विश्वासाने आमच्याच पाठीशी असून ते आम्हाला निश्चितच यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवून देतील असा विश्वासही मदन भोसले यांनी व्यक्त केला.