किसन वीर साखर कारखान्याची निवडणूक सभासदांना सोबत घेऊन लढविणार – मकरंद पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.३० मार्च २०२२ । वाई । किसन वीर यांनी उभारलेला आणि सध्या आर्थिक अडचणीमुळे बंद असलेला साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे कामगारांचे हित जपण्यासाठी सुरु होणे गरजेचे आहे. पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या, सभासदांच्या सातत्याने होणाऱ्या मागणीचा विचार करून सर्वांच्या सहकार्याने किसनवीर सातारा साखर कारखान्याची निवडणूक लढविण्याचा निर्णय आमदार मकरंद पाटील त्यांनी जाहीर केला.

किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे या पार्श्वभूमीवर वाई सातारा जावली कोरेगाव खंडाळा महाबळेश्वर या तालुक्यातील कार्यकर्त्यांचे व शेतकरी सभासदांचे मत आजमावून घेण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला. या मेळाव्याला सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, शशिकांत पिसाळ ,माजी आमदार सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे, नितीन भरगुडे पाटील, राजेंद्र शेठ राजपुरे, अरविंद कदम, बाळासाहेब सोळस्कर, उदय कबुले, नितीन भरगुडे पाटील, बकाजीराव पाटील,शामराव गाढवे, दिलीप पिसाळ, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा गाढवे, चंद्रकांत ढमाळ, मनोज पवार, एस.वाय. पवार, डॉ.नितीन सावंत, तानाजी शिर्के, अमित कदम, रामभाऊ लेंभे, वामनराव जमदाडे आदी मान्यवर व या पाचही तालुक्यातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील पंधरा वर्षात किसन वीर साखर कारखान्याच्या कारभाराबाबत वेळोवेळी तात्कालीन मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती. मात्र पक्षीय कार्यकर्ता असल्याने व आमच्या दोघांमध्ये राजकीय मतभेद असल्याने त्या-त्या मुख्यमंत्र्यांनी या कारखान्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केले. साखर आयुक्त ,सहकार मंत्र्यांकडेही याबाबत तक्रारी केल्या होत्या. सभासदांपुढेही आम्ही वेळोवेळी ही कारखान्याची परिस्थिती मांडली होती मात्र या कारखान्याच्या अध्यक्षांनी सभासदांमध्ये भ्रम निर्माण होईल निर्माण होईल अशी परिस्थिती मांडत राहिले. त्याचा परिणाम कारखान्याची परिस्थिती फारच दयनीय झालेली आहे किसनवीर बरोबरच खंडाळा सहकारी व प्रतापगड सहकारी हे दोन्ही कारखाने बंद आहेत . कारखान्याची मोठी देणी,कर्जे आहेत.कामगारांचे चोवीस महिन्यांचे पगार देणे आणि मागील वर्षाचे ऊसाचे बील देणे बाकी आहे.आर्थिक अडचणीत आलेला कारखाण्याचे पुनर्जीवन करणे अवघड असले तरी सर्व सभासदांनी सहकार्य केल्यास अवघड ही नाही.सर्व राज्यात पूर्वीपासून अग्रगण्य असणारा कारखाना बंद असल्याची खंत सर्व सभासदांना आहे.याबाबत सर्वत्र राज्यात विचारणा होत आहे. ऊस उत्पादक सभासदांची कारखान्याची निवडणूक लढविण्याची वाढती मागणी विचारात घेऊन कारखाना निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. निवडणूक लढवणे आणि जिंकणे सहज सोपी वाटणारी गोष्ट असली तरी कारखाना चालविणे आणि देणी पूर्ण करणे ही अवघड गोष्ट आहे. यासाठी काही तोशिश आणि सहकार्य करण्याची गरज तयारी सर्वांनी ठेवावी अशी विनंती त्यांनी केली.

नितीन पाटील यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थितीचा सखोल आढावा घेऊन कारखान्याची निवडणूक लढणे व जिंकणे सोपे आहे. परंतू तो चालविणे कठीण आहे. विद्मान संचालक मंडळाच्या आर्थिक घोटाळ्यामुळे व चुकीच्या व्यवस्थापनामुळे कारखाना १३५ कोटीं तोटयात असून त्यातच प्रतापगड कारखाना चालविण्यास घेतला. आणि खंडाळा कारखान्याची उभारणी केली त्यामुळे हजार कोटींचा कर्जांचा बोजा झाला आहे. दरवर्षी ५५ कोटी रुपये व्याजाचा बोजा वाढत आहे. मालमत्ता केवळ ७५० कोटींची आहे. त्यावर बँकेने जप्तीच्या नोटीसा बजाविल्या आहेत. यापूर्वी हीच परिस्थिती होती त्यामुळे निवडणूक लढविली नाही. कारखाना कसा सुरु करायचा हाच खरा प्रश्न आहे. हा कारखाना वाचविण्यासाठी शंभर ते दिडशे कोटी भागभांडवल उभे करावे लागेल. त्यासाठी सभासदांनी योगदान दिले तरच कारखाना सुरु होऊ शकतो असे स्पष्ट केले.

यावेळी सदाशिव सपकाळ, नितीन भरगुडे पाटील, वसंतराव मानकुंबरे, प्रताप पवार, बाळासाहेब सोळसकर, शशिकांत पिसाळ य़ांनी मनोगत व्यक्त केले. अजय भोसले, अँड.सचिन गायकवाड, बाजीराव महांगडे, अशोकराव पवार, अजय वांगडे, अतुल जाधव, राजेंद्र गाढवे यांनी कारखाना वाचविण्यासाठी निवडणूक लढवावी अशी सुचना करून सर्व शेतकरी सभासद व कार्यकर्ते खंबीरपणे पाठीशी उभे राहून. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र पुजारी यांनी आभार मानले. यावेळी वाई, खंडाळा. जावळी, कोरेगाव, सातारा या पाच तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी सभासद उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!