दैनिक स्थैर्य । दि.२६ मार्च २०२२ । वाई । किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या सोमवार दि २८ पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दि ३ मे रोजी मतदान होणार असून दि ५ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष मदन भोसले विरुद्ध आमदार मकरंद पाटील यांची पॅनेल यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे.
सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्यामुळे बंद असलेल्या मागील वर्षीच्या ऊस गाळपाची शेतकऱ्यांची देणी कामगारांचे थकलेले यांचे दोन वर्षाचे पगार आणि इतर देणी याची साताऱ्यात जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याची निवडणूक जाहीर न करता कारखान्यावर प्रशासक नेमून सरकार आपल्या ताब्यात कारखाना घेईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, कारखाना अडचणीत असतानाही साखर आयुक्तांनी व सहकार निवडणूक प्राधिकरणानेआरे निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील महिन्यापासून कारखान्याची मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होती. आज ही निवडणूक जाहीर झाली. निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .आज त्यांनी निवडणूक कार्यक्रम अंतिम केला .सोमवार दि२८ पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. दि ४ एप्रिल रोजी अर्जाची छाननी होईल.दि १९ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दि ३ मे रोजी प्रत्यक्ष मतदान होईल आणि दि ५ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष मदन भोसले यांना भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी मोठी रसद पुरविली जाण्याची शक्यता आहे. आज पर्यंत कारखान्याची निवडणूक लढविणार नाही असे म्हणणारे आमदार मकरंद पाटील या निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार, पॅनल उभे करणार काय याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.