
दैनिक स्थैर्य । दि.२२ मार्च २०२२ । सातारा । येथील किसनवीर सहकारी साखर कारखानामधील कामगारांना २५ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने साेमवारी त्यांनी कारखान्याचे गेट समाेर ठिय्या आंदाेलन पुकारले. या आंदाेलनात सुमारे ४०० पेक्षा अधिक कामगार सहभागी झाले आहेत. भुईंज येथील हा कारखाना मागील दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे यावर्षी गाळप सुद्धा हाेऊ शकलेले नाही. परिणामी या कारखान्यातील कामगारांना गेल्या बावीस महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.
आज अखेर किसनवीर सहकारी कारखान्याच्या कामगारांच्या सहनशीलतेचा बांध फुटला, शेकडो कामगारांनी रस्त्यावर उतरून अंदोलनाचे शिंग फुकले , एवढे दिवस मनामध्ये खदखदत असलेल्या भावना जगासमोर आल्या, कारखाना सुरू व्हावा या आशेवर गेली २५ महिने बिनपगारी काम करणाऱ्या कामगारांनी आता कारखाना सुरू होण्याची शक्यता धुसूर झाल्याची दिसताच आपले अंदोलन सुरू केले.
यावेळी कामगारांनी सांगितले की, कामगार हा भुमिपुत्र सुद्धा आहे. अनेकांच्यां वाडवडिलांनी आपली जमिन आपला घाम गाळुन हा कारखाना उभा केला. आज फक्त कारखाना म्हणुन ते ईथे काम करत नव्हते तर त्यांच्यासाठी हे वाडवडिलांनी कष्टाने उभ केलेलं एक मंदिर होतं. हे मंदिर टिकावं म्हणुन ही मंडळी बिनापगारी ऐवढे दिवस काम करत होते. परंतु, शेवटी व्यवस्थापनाच्या अपयशामुळे आज त्यांना मनावर दगड ठेवुन रस्त्यावर उतरावं लागलं आहे.
त्यामुळे कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारा बाहेर आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. या आंदाेलनात सुमारे ४०० कामगार सहभागी झाले आहेत. यावेळी कारखान्यातील ज्येष्ठ कामगार म्हणाले माजी आमदार आणि विद्यमान अध्यक्ष मदन भाेसले आजही हा कारखाना चालावा यासाठी आणि आमच्यासाठी प्रयत्न करीत आहेत हे आम्हांला माहिती आहे. परंतु आमची सहनशिलता संपली आहे. वाढत्या महागाईमुळे आमचे कुटुंब आता त्रस्त झाले आहे. त्यामुळे आज कारखान्यासमाेर आंदाेलन छेडावे लागले आहे.