स्थैर्य, सातारा, दि.१८ : दिल्ली येथे सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सातारा येथे राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मोर्चा काढून त्यातील सहभागींनी मागण्यांचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले.
केंद्राने तयार केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 50 दिवसांपासून दिल्ली येथे पंजाब, हरियाना, राजस्थान, मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी केंद्र आणि शेतकरी संघटनांच्यात चर्चेच्या नऊ फेऱ्या पार पडल्या. मात्र, तोडगा निघाला नाही.
दिल्ली येथे सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आज सातारा येथे आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर प्रदीप बोराटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोर्चाने दाखल झाले. कृषी कायदे रद्द करण्याची, निवडणुकीतील ईव्हीएम मशिनचा वापर बंद करण्याची मागणी करणारे निवेदन आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.