किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड वाटपाकरीता विशेष मोहीमचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ एप्रिल २०२२ । सातारा । किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये किसान क्रेडिट कार्ड वाटपाकरीता विशेष मोहीमेचे 24 एप्रिल 2022 ते  1 मे 2022 या कालावधीत  आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या  मोहिमेमध्ये सहभाग घेऊन किसान क्रेडीट कार्ड योजनेचा  जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन   जिल्हा अग्रणी व्यवस्थापक युवराज पाटील यांनी केले आहे.

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ मिळणाऱ्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने सुरू असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाचा भाग म्हणून शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) वाटपासाठी देशभर मोहीम राबवली जात आहे. या मोहीमेअंतर्गत दिनांक 24 एप्रिल 2022 ते  1 मे 2022 या कालावधीत  सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजीत करण्यात येणार आहेत.

सध्या राज्यात लाखो शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ घेत असून त्यापैकी अनेक शेतकरी किसान क्रेडिट कार्ड पासून वंचित आहेत. याकरीता विशेष ग्रामसभा आयोजीत करून शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जाईल या मोहिमेत शासनाचे कृषी, महसूल, ग्रामविकास, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, मत्स्य संवर्धन विभाग, नाबार्ड आणि सर्व बँका सहभागी होणार आहेत. ही मोहीम   जिल्हाधिकारी  यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व बँका त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये केसीसी अर्ज उपलब्ध करून देतील व शेतकऱ्यांचे अर्ज जमा करून केसीसी स्वरूपात पीककर्ज वाटप करतील. तरी सर्व शेतकऱ्यांनी किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्री. पाटील यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!