दैनिक स्थैर्य । दि. २८ जानेवारी २०२३ । सातारा । नारदीय कीर्तनापासून सुरु झालेली कीर्तन परंपरा आजच्या काळातही समाजप्रबोधनाचे माध्यम म्हणून उपयुक्त ठरताना दिसून येते. आजच्या काळाशी सुसंगत असा कीर्तनाचा अभ्यास केला तर त्यातूनही रोजगाराच्या संधी आजच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. परंतु त्यासाठी परिपूर्ण अभ्यास आणि मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे असे प्रतिपादन प्रा. डॉ. धनंजय होनमाने यांनी छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा येथे मराठी विभाग व वाङ्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यान प्रसंगी केले. कीर्तन परंपरा, तिचा होत गेलेला विकास आणि आजच्या काळातील कीर्तनाची स्थितीगती याविषयी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी प्राचीन परंपरेबरोबरच संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज यांच्या समाजप्रबोधनात्मक कीर्तनाची आज समाजाला नितांत गरज आहे. अशा प्रकारची कीर्तनातून समाजाला दिशा देण्याचे काम निश्चितच होईल असे प्रतिपादन त्यांनी केले.त्यांनी ‘या भारतात बंधुभाव नित्य वसु दे’ हे संत तुकडोजी महाराज यांचे गीत सादर केले . आजच्या काळात संविधांनाच्या स्वप्नातला भारत उभा करण्यासाठी,आणि राष्ट्रीय एकात्मता ,समता ,बंधुता,स्वातंत्र्य व न्याय या मुल्यांची
समाजात रुजवण होण्यासाठी प्रभावी कीर्तनकार तयार करण्याची व भक्तीपेक्षा समाजशिक्षण करण्याची गरज आज जास्त असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालायचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे, उपप्राचार्य डॉ. मानेदेशमुख, उपप्राचार्या डॉ. रोशनआरा शेख यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांची ओळख कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. कांचन नलवडे यांनी केली. कार्यक्रमाचे आभार डॉ. विद्या नावडकर यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सोनाली जाधव व कु. समीक्षा चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी वाङ्मय मंडळाच्या प्रमुख प्रा. डॉ. सविता मेनकुदळे या उपस्थित होत्या. मराठी विभागातील डॉ. संजयकुमार सरगडे , प्रा. श्रीकांत भोकरे हे उपस्थित होते. वाङ्मय मंडळातील सदस्य प्रा. विजया गणमुखी, प्रा. मनोज धावडे, प्रा. पायल शेळके. डॉ. वर्षा माने, प्रा. देवकुळे उपस्थित होते. त्याचबरोबर प्रा. डॉ. केशव मोरे आणि डॉ. प्रदीप शिंदे उपस्थित होते. त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.