दैनिक स्थैर्य । दि. ११ जानेवारी २०२३ । फलटण । येथील दैनिक ‘सकाळ’ या वृत्तपत्राचे शहर प्रतिनिधी तथा साप्ताहिक ‘सह्याद्री बाणा’ या वृत्तपत्राचे संपादक किरण बोळे यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या या राज्यपातळीवरील संस्थेच्यावतीने सन 2022 च्या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय ‘विशेष दर्पण पुरस्कारा’ने राज्याचे मंत्री ना.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 30 व्या ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण, कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे व कुडाळ (जि.सिंधुदुर्ग) येथील ज्येष्ठ राष्ट्रीय कलावंत पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) येथील ’दर्पण’ सभागृहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ होते. व्यासपीठावर माजी आमदार अजित गोगटे, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, पोंभुर्लेच्या सरपंच प्रियांका धावडे, माजी सरपंच सादिक डोंगरकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, सुधाकर जांभेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.किरण बोळे हे गेल्या 23 वर्षांहून अधिक काळापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारितेबरोबरच ग्राहक चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या प्रदीर्घ कार्याबद्दल ‘विशेष दर्पण पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात आले असून पुरस्काराबद्दल पत्रकारितेसह विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.