सातारा जिल्ह्यातील शिवसेनेला खिंडार; पुरूषोत्तम जाधव यांच्यासह ७०० जणांचा शिंदे गटाला पाठिंबा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२२ । सातारा । जिल्ह्यातील ९९ टक्के शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत राहणार आहेत. आजपर्यंत राष्ट्रवादीने जिल्ह्यात कळीचे राजकारण केलेले आहे. पण, आता आम्ही सर्व भूमीपुत्राच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असून 2024 मध्ये राष्ट्रवादीचे उच्चाटन करू, असा विश्वास शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम जाधव यांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी आज एकनाथ शिंदे गटास आपला पाठींबा जाहीर केला. यानंतर त्यांनी शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये पुरुषोत्तम जाधव, वासुदेव माने, शरद कणसे, जालिंदर गोडसे, निलेश मोरे, रुपेश सपकाळ यांच्या काही पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

भूमिका मांडताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्याला आनंद झाला आहे. आता जिल्ह्यातील शिवसेनेची भूमिका काय असेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गेली दोन दिवस मी जिल्ह्यात फिरत असून सर्व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यामध्ये अपेक्षेपेक्षा उत्स्फूर्तपणे आजी माजी 700 पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पाठिंबा दिला आहे. अनेक ग्रामपंचायतींनी पत्राद्वारे पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येथून पुढे जिल्ह्यात शिंदे गटाचे चांगले संघटन बांधले जाणार आहे. आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी आपल्या हाडाची काडे केली पण पक्षाने आमच्यासाठी काय केलं, हे महत्त्वाचं आहे. जिल्ह्याला निधी नसल्याने अनेक विकासकामे प्रलंबित आहेत. त्यामुळे आम्ही शिंदे साहेबांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावणार आहोत. मुळात उद्धव ठाकरे हे युतीचे मुख्यमंत्री हवे होते. पण ते झालं नाही. आज आम्ही सर्वांनी संघटनात्मक काम सुरु केलं आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात भगवाच फडकेल. आज जे प्रश्न अनुत्तरित आहे त्याच्यासाठी निधी मिळाला नाही. कारण हा सर्व निधी बारामतीला जातोय हे दुर्दैव आहे. आगामी काळात अनुत्तरित प्रश्न ते यापुढे लावून धरणार असून मेडिकल कॉलेज, एमआयडीसी, रस्त्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मार्गी लावला जाणार आहे.

उदयनराजेंविरोधात मला लढायचे नव्हते. त्यांच्याविषयी आणि सातारच्या गादीविषयी आम्हाला प्रचंड आदर आहे. त्यावेळी उदयनराजे हे राष्ट्रवादीत होते. त्यामुळे पक्षाच्या सूचनेनुसर मी त्यांच्याविरोधात लढलो. आता आम्ही दोघेही एकाच पक्षात आहोत. त्यामुळे उदयनराजेंशी माझी लढाई नसून राष्ट्रवादी काँग्रेसशी आहे, असेही श्री. जाधव यांनी स्पष्ट केले.

बानुगडे कोण, मी ओळखतच नाही….
शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांच्याविषयी विचारले असता पुरुषोत्तम जाधव म्हणाले, कोण नितीन बानुगडे पाटील मी त्यांना ओळखत नाही. त्यांना केवळ बोलता येते, त्यांना पक्ष संघटनेची बांधणी करता येत नाही. त्यांच्याकडून काहीही अपेक्षा करणे योग्य नाही, असा टोला ही त्यांनी लगावला.


Back to top button
Don`t copy text!