दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२२ । आटपाडी । आटपाडीतील खिलार पशु पालक दिवंगत कै. आनंदरावआप्पा जाधव, कै . शाहीर जयंत जाधव यांच्या खिलार गाईच्या खोंडाला ५ लाख ११ हजार रुपये किंमत आल्याने आटपाडी तालुक्यासह संपूर्ण माणदेशात आश्चर्ययुक्त समाधान व्यक्त होत आहे . एबीपी माझा मराठी दुरचित्रवाणीचे संपादक राजीव खांडेकर यांनी याचे कौतुक केले आहे .
कै . आनंदराव जाधव यांचे कनिष्ट सुपुत्र आणि कै .शाहीर जयंत जाधव यांचे लहान बंधू श्री .संताजीराव जाधव यांनी खिलार पशुंवर जीवापाड प्रेम करीत त्यांचा सांभाळ केला . ३ खिलार गाई ,१ कालवड, ३ म्हैशी, १ खोंड अशा ८ जनावरांचा गोठा असलेल्या संताजीराव जाधव यांनी नेहमीच जनावरांवर पोटच्या मुलांसारखे जिवापाड प्रेम केले . प्रचंड , मेहनत कष्ट करणाऱ्या संताजीराव जाधव यांच्या परिवाराने यापूर्वी अनेक जातीवंत, चपळ, देखणी, जनावरे मोठ्या किंमतीना विकून मोठा विक्रम केला होता . यापूर्वी ३ लाख ४१ हजार रुपये किंमतीला पुण्याच्या नितिनआबा शेवाळे यांना जाधव यांनी खोंड विकला होता . त्यापूर्वी कर्नाटकातील मनाल कलगी या गावच्या पशुपालकास जाधव यांचा २ लाख २१ हजार रुपये किंमतीस खोंड विकला गेला होता . प्रवण शिवाजीराव हारगुडे रा . विटा यांना जाधव यांचा २६ महिन्याचा पिस्तुल नावचा हा खोंड ५ लाख ११ हजार रुपयाला विकला जावून हा एक किंमतीचा मोठा विक्रम ठरला आहे .
संताजीराव जाधव यांनी आपले पुतणे संग्राम जयंत जाधव, प्रताप जयंत जाधव, सुपुत्र युवराज संताजी जाधव,भाचे प्रसाद नलावडे यांच्या साथीने पशुपालन करीत आज अखेर ५ खिलार खोंड विक्रमी किंमतीला विकून खिलार जनावरांची महती वाढीस लावली आहे .
औंधांच्या राजांनी आपल्या भागात खिलार जनावरांसाठी मोठा राजाश्रय दिल्याचा २०० वर्षाचा मोठा इतिहास आहे . सध्याच्या यांत्रीक युगात जनावरे पाळणे जवळपास दुरापास्त होत असताना, आणि आर्थिक दृष्टया जनावरांचे संगोपन परवडत नसताना, केवळ खिलार जनावरांवरील उत्कट प्रेमामुळे आणि वडिल, व बंधुचा वारसा पुढे जतन करण्याच्या हेतूनेच संताजीराव जाधव खिलार जनावरांच्या संवधर्नासाठी मोठा खर्च करीत आहेत . मोठ्या किंमतीस खोंड विकल्या बद्दल संताजीराव व जाधव परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
विक्रमी किंमत आलेल्या खिलार खोंडाची पाहणी करून उत्तम सांभाळ केलेल्या जाधव परिवारास एबीपी माझा मराठी दुरचित्रवाहीनी मुंबईचे संपादक राजीव खांडेकर यांनी धन्यवाद दिले . महत्प्रयासाने सांभाळ केल्या जाणाऱ्या देखण्या चिवट काटक खिलार जनावरांबद्दल राजीव यांनी कौतुकाचे बोल काढले . पिस्तुल या खोंडाचे त्याच्या गळ्यावर हात फिरवीत त्याला थोपटत खांडेकर दांम्पत्यांने कौतुक केले .
यावेळी सौ . जान्हवी राजीव खांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, डॉ . विनय पत्की, अरुण डोंबे, संताजी जाधव, राजेंद्र जाधव, प्रताप जाधव, विक्रमसिंह जाधव, प्रसाद नलवडे, प्रा. विजय शिंदे, कुर्बानहुसेन खाटीक इत्यादी अनेक जण उपस्थित होते.