दैनिक स्थैर्य | दि. २० ऑगस्ट २०२३ | फलटण |
पावसाने ओढ दिल्याने फलटण तालुक्यात पुरेसा पाऊस न झाला नाही. त्यामुळे टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत टंचाई आढावा घेण्यात आला. यावेळी आ. दिपक चव्हाण यांनी तालुक्यात ९२ टक्के क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून या पाऊस पडत नसल्याने या सर्व पेरण्या संकटात आल्याचे म्हटले आहे.
या आढावा बैठकीस सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी सचिन ढोले, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नायब तहसीलदार तुषार देशमुख, महसूल नायब तहसीलदार एन. डी. काळे, निवासी नायब तहसीलदार डॉ. सौ. डी. एस. बोबडे – सावंत, संजय गांधी योजना नायब तहसीलदार डॉ. भक्ती सरवदे, निवडणूक नायब तहसीलदार शबाना बागवान उपस्थित होत्या.
पावसाने ओढ दिली असली तरी शेतकर्यांनी पावसाच्या अपेक्षेवर आणि उपलब्ध पाण्यावर खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. तालुक्यात १५ हजार ३८७ हेक्टर खरीप क्षेत्र असून त्यापैकी १४ हजार २०७ हेक्टर म्हणजे सुमारे ९२.३३ टक्के खरीप क्षेत्रावर पेरा झाला आहे.
उसाचे संपूर्ण क्षेत्र येणार अडचणीत
तालुक्यात आडसाली उसाचे क्षेत्र ८ हजार ५२९ हेक्टर असून त्यापैकी आजअखेर ४ हजार ९१५ हेक्टरवर आडसाली उसाच्या लागणी झाल्या आहेत, त्याशिवाय सुरू, खोडवा असे तालुक्यात एकूण ऊसाचे क्षेत्र जवळ पास १७ हजार हेक्टर आहे. धरणातील पाणीसाठे मर्यादित झाल्याने ऊसाचे हे संपूर्ण क्षेत्र संकटात असून पाऊस झाला नाही तर संकटात वाढ होणार, नव्हे मोठे क्षेत्र हातातून जाण्याचा धोका आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आधार मिळणार का ?
पावसाने ओढ दिल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, तथापि यावर्षी दिलासा देणारी बाब म्हणजे केंद्र व राज्य शासनाने केवळ १ रुपया भरून आपल्या पिकाची नोंदणी करणार्या शेतकर्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत संरक्षण उपलब्ध करून दिले आहे.
प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास धुमाळ, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यात कृषी व महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी अगदी बांधापर्यंत जाऊन प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकर्यांना समजावून देवून मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे.
तालुक्यात कांदा व बाजरी या पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण देण्यात आले असून तालुक्यातील २४ हजार ६३२ शेतकर्यांना ११ हजार ४१८ हेक्टर क्षेत्रातील कांदा व बाजरी पिकासाठी विमा संरक्षण उपलब्ध झाले आहे. कांदा हेक्टरी ४६ हजार रुपये आणि बाजरी हेक्टरी १८ हजार रुपये जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळणार आहे.
खास मोहिमेद्वारे ई – पीक पाहणी
शासनाने यावर्षी ई – पीक पाहणी यंत्रणाही महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून प्रभावीरीतीने राबविली असल्याने फलटण तालुक्यात खरीप हंगामात ६ हजार ११६ शेतकर्यांनी ४ हजार २१० .१० हेक्टर क्षेत्रातील पीक पाहणी किंवा आपल्या पिकांची नोंदणी मोबाईल अपद्वारे केली आहे. त्यामुळे पिकासंबंधी कोणतीही माहिती तातडीने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. उर्वरित शेतकर्यांनी आपली ई – पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.