1 लाख 59 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
स्थैर्य, खंडाळा, दि. ०६ : प्रेमीयुगुलांना चाकूचा धाक दाखवून रोकड व दागिने, किमती साहित्य लुटणार्या टोळीतील तिघांना खंडाळा पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 1 लाख 59 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केले आहे. त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे.
याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 जानेवारी रोजी राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातील सातारा लेनच्या दक्षिणेस भैरवनाथ मंदीराकडे खाली जाणार्या रस्त्यावर फिर्यादी व त्यांची मैत्रीण थांबले होते. यावेळी अज्ञात दोन इसम त्याठिकाणी आले. एकाने फिर्यादीच्या मैत्रीणीच्या गळ्यास चाकू लावला तर दुसर्याने फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करून दोन मोबाईल फोन, सोन्याची अंगठी, रोख रक्कम व नवीन पल्सर चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने चोरुन नेली होती. याप्रकरणी खंडाळा पोलिस ठाण्यात 1 लाख 65 हजार 400 रुपयांचा जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी तपासी अधिकारी सपोनि हनुमंत गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो. ना. सचिन वीर, प्रशांत धुमाळ सुरेश मोरे व बालाजी वडगावे यांनी गुन्ह्यातील चोरीस गेलेले मोबाईल व घटनास्थळावरील डाटा संकलित करून तांत्रिक बाबीच्या आधारे पृथःकरण करून काही संशयित क्रंमाक काढून सखोल तपास केला. त्यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार दादा उर्फ संजय बारीकराव जाधव रा. रामोशी वस्ती मुळीकवाडी, फलटण याने साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तेंव्हापासून दादा जाधवचा शोध खंडाळा पोलीस पथक घेत होते. दि. 5 जुलै रोजी दादा जाधव वेळे येथे खंबाटकी घाटमार्ग जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर खंडाळा पोलिसांनी त्याप्रमाणे सापळा लावला. यावेळी दादा जाधव दुचाकीवरून जात असताना जुना टोलनाका खंडाळा येथे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने व साथीदार पप्पू सर्जेराव जाधव वय 24 वर्ष, रा. रामोशी वस्ती, मुळीकवाडी, ता. फलटण, तुषार बाळासाो पाटोळे वय 20 वर्ष, रा. तरडगाव, ता. फलटण आणि अजित महादेव बोडरे, मु. पो.तांबवे, ता. फलटण या हे गुन्हे केल्याची कबूली दिली. त्यानंतर पोलिसांनी पप्पू जाधव आणि तुषार पाटोळेस अटक केली आहे तर अजित बोडरे फरार आहे. अटक करण्यात आलेल्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेली दुचाकी व दोन मोबाईल असा 1 लाख 59 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहेचोरट्यांनी खंबाटकी घाटात व धोम बलकवडी कॅनॉल लगत दोन प्रेमी युगुलांना मारहाण करून जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबूली दिलेली आहे. दोन चोरीच्या मोटारसायकली मिळून आलेल्या असून एक मोटारसायकल लोणंद व दुसरी बारामती येथून चोरी केली असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे.
हिंगणगाव येथून दोन जर्शी गाई चोरून बारामती येथे विक्री केलेल्या असल्याचे व चार शेळया व एक बोकड चोरी करून विक्री केल्याची कबूली आरोपींनी दिलेली आहे. एकुण 06 गुन्हे आरोपीकडून उघडकीस आलेले आहेत.याप्रकरणी तपास खंडाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड हे करीत आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, फलटण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि हनुमंत गायकवाड, गुन्हे प्रकटीकरणचे सचिन वीर, प्रशांत धुमाळ, सुरेश मोरे व बालाजी वडगावे, नितीन नलवडे, संजय थोरवे व शांताराम शेलार यांचे पथकाने केली.