खा. श्री. छ. उदयनराजे यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीत


स्थैर्य, 5 फेब्रुवारी, सातारा : अजितदादा पवार यांचे अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे नुकतेच निधन झाले. त्यांच्या वियोगाचे दुःखातुन महाराष्ट्र अजुन सावरलेला नाही. म्हणूनच दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी वाढदिवस साजरा करणार नाही, अशी माहिती एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

खा. श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचे नुकतेच दुदैवी विमान अपघातात दुःखद निधन झाले. एक हरहुन्नरी आणि सडेतोड स्वभावाचे धडाडीचे नेतृत्व काळाने आपल्यातुन हिरावून नेले. मन पिळवटून टाकणारी ही घटना, जबर धक्का देणारी ठरली. आज आपल्यात अजितदादा नाहीत ही कल्पनाच महाराष्ट्रवासियांना करवत नाही, अजुनही विश्वास बसत नाही.
स्व. अजितदादांचे आणि उदयनराजेंचे ऋणानुबंध काही वेगळेच होते. महाविदयालयीन जीवनातील आमची झालेली ओळख आणि पुढे त्या ओळखीचे मैत्रीत रुपांतर कधी झाले हे आम्हालाही कळले नाही. अतिशय दिलदार मनाचा हा मोठा माणुस, महाराष्ट्राला कामाचा माणुस म्हणून ओळखत होता. आमची मैत्री होतीच तथापि त्याला वेगवेगळी कारणे होती. मैत्रीतही आमचे वैचारिक मतभेद होते परंतु मनभेद नव्हते. लक्ष साधण्याचे मार्ग कदाचित वेगळे असतील परंतु आमचे लक्ष एक होते. सांगण्यासारख्या खुप आठवणी आहेत. तथापि शब्द सूचत नाहीत. दादांवर प्रेम असणा-या प्रत्येक माणसाचा आजच्या मानसिकतेचा विचार करुन, आमचा येणारा 24 फेब्रुवारी 2026 रोजीचा वाढदिवस आम्ही साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

अजितदादांच्या जाण्यामुळे कै. दादांचे कुटुंब आणि महाराष्ट्रातील जनता सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. दुःख प्रचंड आहे, मित्राची अकाली एक्झीट आमच्या जीवाला चटका लावणारी आहे. म्हणूनच आम्ही आमचा वाढदिवस साजरा करणार नाही. सातारा जिल्हयातील, महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील आमच्यावर प्रेम करणा-या कोणत्याही व्यक्तीने, कार्यकर्त्यांनी, जनतेने आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करु नये, कोणास सामाजसेवा म्हणून काही करण्याचे असल्यास त्यास आमच्या वाढदिवसाचे निमित करु नये किंवा त्याची कोणतीही प्रसिध्दी किंवा गाजावाजा करु नये असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!