भाजपातर्फे २१ जून रोजी राज्यभर योग शिबिरांचे आयोजन; भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १८: महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे जागतिक योग दिनानिमित्त राज्यभर  २१ जून रोजी २७०० पेक्षा अधिक ठिकाणी योग शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राज्यभरातील एक कोटीहून अधिक नागरिक सहभागी होतील, अशी माहिती प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपाध्ये बोलत होते.

श्री. उपाध्ये यांनी यावेळी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दर वर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.जागतिक योग दिनाचे औचित्य साधून राज्यातील २७०० पेक्षा अधिक ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर उत्तम आरोग्यासाठी योगसाधनेचे महत्व लोकांना पटवून दिले जाणार आहे.

स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ‘काळे पर्व’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणीबाणीद्वारे काँग्रेसने लोकशाहीची हत्या केली. आणीबाणी काळात सरकारी यंत्रणेकडून झालेल्या अत्याचार व दडपशाहीमुळे या काळात देशभर भयाचे व असुरक्षिततेचे सावट निर्माण झाले होते. वृत्तपत्रांतील बातम्या, लेख यांच्यावर सेन्सॉरशिप लादली गेली होती.    या काळातील काँग्रेसी अत्याचारांची कहाणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी २५ जून हा आणीबाणीविरोधी काळा दिवस पाळण्यात येणार असून त्या दिवशी राज्यात जिल्हा स्तरावर भाजपच्या वतीने व्हिडियो कॉन्फऱन्स, पत्रकार परिषदा व समाज माध्यमांद्वारे आणीबाणीच्या जखमांच्या जाणीवा समाजास करून देण्यात येतील, असेही श्री. उपाध्ये यांनी नमूद केले .

श्री. उपाध्ये यांनी सांगितले की, योग शिबिरांमध्येही पक्षाचे सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. योगविद्येचा प्रसार व्हावा आणि योगाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी सहभागी होणारे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व सर्वजण योग शिबिरातील किंवा वैयक्तिक योगसाधनेची छायाचित्रे व व्हिडियो समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करणार आहेत.  योगाभ्यास हे शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्याचे प्रभावी साधन सिद्ध झाले असून भारतीय संस्कृतीची ही महान परंपरा आता जगभरातील जवळपास २०० देशांनीही स्वीकारली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे व मनाचे सामर्थ्य वाढविणे यांसाठी योगसाधना उपयुक्त मानली जाते. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी जगभर योग दिन साजरा व्हावा असा प्रस्ताव मांडला. योग दिन हा अलीकडच्या काळातील वैश्विक सहमतीचे प्रतीक ठरला असल्याने, योगाभ्यासाचा जनक असलेल्या भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे, असेही श्री. उपाध्ये यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!