स्थैर्य, चेन्नई, दि.४: निवार या
चक्रीवादळानंतर बंगालच्या उपसागरात आणखी एक चक्रीवादळ घोंघावत आहे. या
वादळामुळे तामिळनाडू आणि केरळ राज्यांना धोका निर्माण झाला आहे. या
चक्रीवादळाला बुरेवी असं नाव देण्यात आलं असून शुक्रवारी ते केरळ आणि
तमिळनाडूच्या किना-यावर धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात
आली आहे. मासेमारीसाठी समुद्रकिना-यावर अथवा खाडीत जाऊ नये, असे आवाहन
मच्छिमारांना करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात निवार या चक्रीवादळाने
दक्षिणेकडील राज्यांमध्ये मोठे नुकसान केले होते. प्रामुख्याने तामिळनाडू
आणि पुद्दुचेरीला मोठा फटका बसला होता.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार चक्रीवादळ बुरेवीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच
या काळात केंद्र सरकार तामिळनाडू आणि केरळमधील नागरिकांना सर्वतोपरी मदत
करण्यास वचनबद्ध आहे. गृहमंत्र्यांनी याबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री के.
पलानीस्वामी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवर बातचित
केली.