दैनिक स्थैर्य । दि. ७ जुलै २०२१ । फलटण । सोनवडी बु., ता.फलटण येथे सुमारे 11 वर्षांपूर्वी घडलेल्या खून प्रकरणातील फरारी आरोपी केनशा भगवान काळे याला अखेर जेरबंद करण्यात फलटण पोलीसांना यश आले आहे.
याबाबत फलटण पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनवडी बु., ता.फलटण येथे दिनांक 20 जुलै 2010 रोजी अनैतिक संबंध व पैशाच्या वादातून सौ.राणी रवींद्र काळे यांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती. सदर गुन्ह्यात रब्या भगवान काळे, केनशा भगवान काळे, फुलाबाई भगवान काळे, भगवान मुगुटराव काळे, आलिशान हुंकार भोसले अशा पाच आरोपींविरोधात फियादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी केनशा भगवान काळे, रा.न्याहळी, ता.इंदापूर हा अपराध घडल्यापासून फरार होता.
फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक चतुरे यांना बातमीदारामार्फत नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी केनशा भगवान काळे हा निमगाव केतकी ता. इंदापुर, जि. पुणे येथील एका हॉटेलवर येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, व फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बनकर, पोलीस नाईक चतुरे, पोलीस शिपाई मेगावडे, पोलीस शिपाई सांडगे, पोलीस शिपाई जगताप असे पथक तयार करुन या पथकाने सदर आरोपीस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.
केनशा काळे विरुद्ध लोणंद पोलीस ठाणे व फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे यापूर्वीच दाखल असून याशिवाय त्याच्याकडून फलटण शहरातील व आसपासचे भागातील घरफोडीसारखे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करीत आहेत.