स्थैर्य ,मुंबई, दि. ०४: मुंबईजवळील पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद हायवेवर 17 फेब्रुवारीला मनोर गावातून एक महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या पतीच्या हत्येप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले होते. आरोपींमध्ये हत्या झालेल्या ऑटो ड्रायवरची पत्नी आणि तिचा प्रियकर सामील आहे. दोघे पोलिस विभागात कार्यरत आहेत. महिलेचा पति ऑटोरिक्शा चालक होता आणि त्याच्या हत्येला अपघात दाखवण्यासाठी ऑटो नाल्यात फेकून देण्यात आला होता.
पालघर पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले की, वसईतील मणिकपुर पोलिस स्टेशनमध्ये तैनात महिला पोलिस कर्मचारी आणि तिच्यासोबत त्याच ठिकाणी काम करणाऱ्या एका कॉन्स्टेबलमध्ये प्रेम संबंध होते. या प्रकरणाची माहिती महिलेचा पती पुंडलिक पाटिल याला कळाली. यानंतर पत्नीसोबत त्याचे भांडण होऊ लागले. या भांडणामुळे पत्नीने पतीचा काटा काढण्याचा कट रचला.
पाच आरोपी अटकेत
याप्रकरणी पोलिसांनी कॉन्स्टेबल स्नेहल पाटील, पोलिस कॉन्स्टेबल विकास वसंत पश्ते (30), स्वप्नील मार्तंड गौरी, अविनाश भोईर आणि विशाल पाटीलला अटक केले आहे. तपासात समोर आले की, पुंडलिकची हत्या विकास वसंत पश्तेने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने केली आणि यात स्नेहलदेखील सामील होती.
असा झाला घटनेचा खुलासा
पालघर पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पुढे सांगितले की, आरोपींनी या हत्येला अपघाताचे स्वरुप देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, डोक्यावर लागलेला घाव आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून ही हत्या असल्याचे समोर आले. यानंतर परिसरातील 100 पेक्षा जास्त cctv कॅमेऱ्यातून शोध घेण्यात आला. तसेच, हजारो कॉल रिकार्ड्स चेक केल्यानंतर घटनेचा खुलासा झाला.