लोकहितार्थ निर्णयाला केळघरच्या व्यावसायिकांनी ठेंगा दाखवत केळघरची बाजारपेठ सुरूच ठेवली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मेढा, दि. १० :  जावली तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जावली पंचायतचे समितीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी तालुक्यातील सरपंचांसह काही प्रमुख व्यक्तींना बोलावून पंचायत समितीच्या सभागृहात तातडीची बैठक घेतली. तालुक्यातील मेढा, केळघर, कुडाळ, करहर, आनेवाडीसह इतर ठिकाणची दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन जनता कर्फ्यू लावण्यात आला; परंतु उपसभापती सौरभ शिंदे यांनी घेतलेल्या लोकहितार्थ निर्णयाला केळघरच्या व्यावसायिकांनी ठेंगा दाखवत केळघरची बाजारपेठ सुरूच ठेवली आहे.

दरम्यान, स्पीकरवरून आवाहन करणार्‍यांनीच निर्णयाला हरताळ फासल्याने चर्चेला उधाण आले आहे. केळघर गावच्या सरपंचांनी शुक्रवारी आठवडा बाजारासाठी आलेल्या परगावच्या व्यावसायिकांना आठवडा बाजार भरवणार नसल्याचे सांगून केळघरमधून हाकलून लावले आणि केळघरची बाजारपेठ नंतर सुरू ठेवल्याची चर्चा ऐकण्यास मिळत होती.

 

सोशल मीडियावर याविषयी चर्चा झाल्यावर रविवारी कोरोना रोखण्यासंदर्भात उपसभापती सौरभ शिंदे यांनी पंचायत समितीमध्ये बैठक बोलविली. यावेळी चर्चा होवून दि. 5 पासून दि. 14 पर्यंत तालुक्यात जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविण्यात आले. तसे स्पीकरवरून जनतेला सूचना व आवाहन करण्यात आले. परंतु स्पीकरवरून आवाहन करणार्‍यांनीच आवाहनाला काळिमा फासत केळघरची बाजारपेठ सुरू ठेवल्याने जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे. जावली तालुक्यात कोरोना आपले पाय पुन्हा जोमाने भक्कम करत असताना प्रशासकीय पातळीवर अधिकारी कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करताना दिसत आहेत. प्रशासनाला सहकार्य म्हणून जनतेने स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवले आहेत. परंतु प्रशासनाचा दबाव वापरणार्‍या केळघर ग्रामपंचायतीने जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेतला नसल्याने तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

 

मेढा, करहर आणि कुडाळ बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात उपसभापतींसह इतरांना यश आले असून केळघर, आनेवाडी, सायगावची बाजारपेठ बंद ठेवण्यात अपयश आले आहे. उपसभापतींनी संबंधित ग्रामपंचायतींना तातडीने सूचना करून जनता कर्फ्यूत सहभागी होण्यास सांगावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!