सकारात्मक विचार ठेवल्यास तणावमुक्ती मिळेल – राज्यपाल रमेश बैस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ एप्रिल २०२३ । मुंबई । शरीर, मन स्वस्थ आणि विचार सकारात्मक असल्यास तणावमुक्त जीवन जगता येईल व चेहऱ्यावर प्रसन्नता येईल. आज विद्यार्थ्यांपासून प्रौढांपर्यंत तणावपूर्ण जीवन जगत आहेत. अशावेळी आपल्या कार्यस्थळाच्या ठिकाणी थोडा वेळ काढून योग केल्यास तो उत्तम आरोग्य तसेच तणावमुक्तीच्या दृष्टीने उपयुक्त  ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवारी (दि. ७) राजभवन येथे ‘कैवल्यधाम’ योग संस्थेतर्फे ‘कार्यालयीन योग’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत राज्यपाल बोलत होते.

आरोग्य दिनानिमित्त हृदयविकाराच्या धक्क्याच्या वेळी रुग्णाला वाचविण्यासाठी वापरावयाचे इमर्जन्सी वैद्यकीय तंत्र (सीपीआर टेक्निक) या विषयावर देखील व्याख्यान व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यालयाच्या ठिकाणी काही क्षण वेळ काढून योग करण्याची नव्याने रुजू होत असलेली संकल्पना जीवनशैली संबंधित आजारांकरिता चांगली असून योग म्हणजे केवळ शारीरिक आसने किंवा श्वसनाचे व्यायाम नसून योग ही निरामय जीवनासाठी समग्र जीवनशैली असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

हृदयविकाराचा धक्का आल्यास किंवा श्वास थांबल्यास उपस्थित लोकांनी सीपीआर तंत्राचा वापर केल्यास रुग्णाला जीवनदान देता येते. हे तंत्र सोपे आहे. त्यामुळे सर्वांनी हे तंत्र शिकून घेतले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी कैवल्यधाम संस्थेच्या वतीने योगशिक्षक रवी दीक्षित यांनी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी योग कार्यशाळा घेतली. राज्यपालांसह सर्वांनी यावेळी योग केला.

सीपीआर तंत्र शाळेत व महाविद्यालयात शिकवावे : डॉ. समीर पागड

हृदयविकाराच्या धक्क्यामुळे एखाद्या व्यक्तीचा श्वास थांबल्यास त्याच्या छातीवर विशिष्ट पद्धतीने व वारंवारतेने दाब दिल्यास हृदयाचे पंपिंग सुधारून रुग्णाचा जीव वाचवता येते. हे तंत्र सोपे असून ते सर्व शाळा व महाविद्यालयात आवर्जून शिकविले पाहिजे, असे प्रतिपादन बॉम्बे हॉस्पिटल येथील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. समीर पागड यांनी केले.

यावेळी कैवल्यधामचे विश्वस्त डॉ. दिनेश पंजवाणी व राजभवन येथील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!