दैनिक स्थैर्य । दि. ०५ डिसेंबर २०२२ । ठाणे । ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून स्वच्छ आणि सुंदर ठाणे साकाराण्याकरिता लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘माझे ठाणे’ ही भावना मनात ठेवून उत्कृष्ट दर्जाचे काम करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
ठाणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आदि मान्यवर उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच ठाणे महानगरपालिकेचा विशेष उपक्रम “मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे” या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, हा दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा व आनंदाचा दिवस आहे. विकासाचा शुभारंभ हा मुख्यमंत्री म्हणून आनंदाचा दिवस आहे. मला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याची व राज्याची सेवा करण्याची संधी ठाणेकरांनीच दिली आहे. ठाणेकरांनी ठाण्याच्या विकासात पुढे येऊन योगदान देणे आवश्यक आहे. ठाणेकर सुज्ञ आहेत. या ठाण्यावर बाळासाहेबांनी विशेष प्रेम केले आहे. बाळासाहेबांच्या काळातील दादोजी कोंडदेव स्टेडियम कात टाकतेय. या स्टेडियमच्या नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. वाड्यापाड्याचे टुमदार जुने ठाणे विकसित होत आहे. ठाण्यात भविष्याच्या दृष्टीने नवनवीन बदल होत आहेत. यामुळे ठाणेकरांना आधुनिक सेवासुविधा मिळत आहेत. ठाण्याचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
मुंबईच्या जडणघडणीतसुद्धा ठाण्याचे वेगळे योगदान आहे. कोवीड काळात ठाण्यातील डॉक्टर, नर्स हे मुंबईत सेवा देत होते. राज्याचे, देशाचे वैभव असलेल्या मुंबईला साथ देणारे ठाणे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, यासाठी सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. हे शहर स्वच्छ, सुंदर, निरोगी, हिरवेगार असले पाहिजे. हे शहर आणखी हिरेवगार करण्यासाठी काय केले पाहिजे यावर विचार व्हावा. सार्वजनिक जागा, मंडई, मच्छी मार्केट, बागा हे कायमस्वरुपी स्वच्छ करुन त्यांचे सुशोभीकरण करावे. हे काम युद्ध पातळीवर करायचे आहे. शहरातील रस्ते, उड्डाणपूल हे यांत्रिकीकरणाद्वारे स्वच्छ झाले पाहिजे. शहराचे प्रवेशव्दार, भितीचित्रे, रस्ते दूभाजकांची रंगरंगोटीचे काम सुरु आहे. चांगल्या रस्त्यांवर लेन मार्किंग, उड्डाणपूलाचे सौंदर्यीकरण व्हायला हवे. लोकांना त्याचा आनंद घेता आला पाहिजे. यावर महापालिका काम करत आहे. पुढील चार महिन्यात शंभर टक्के रस्ते सिमेंट कॉक्रिटचे होतील. एकूण 142 किमीचे रस्त्यांचा काम सहा महिन्यात करावे. सेवा रस्ते वापरात आणून मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ठाणे शहराच्या स्वच्छते सोबत, ही स्वच्छता करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपुलकीची भावना व्यक्ती केली. ते म्हणाले की, शहराच्या स्वच्छतेतील महत्त्वाचे योगदान असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याबरोबर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी महापालिकेमार्फत करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत.
जनतेचा निधी जनतेसाठी आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधापुरवण्यासाठी वापरण्यात यावा. ठाणे शहराच्या विकासासाठी 605 कोटींचा निधी दिला आहे. राज्य सरकार व महापालिका निधी देईल. मात्र अधिकाऱ्यांनी दर्जात्मक कामे करावे. यामध्ये कुठलेही कसूर करू नये विकास कामांना गती देण्याची क्षमता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात आहे. अधिकाऱ्यांनी त्या क्षमतेचा वापर करुन विकास कामांना गती द्यावी, अशी अपेक्षाही यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केली.
नव नियुक्त आयुक्तांचे विशेष कौतुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्या कामाबद्दल विशेष कौतुक केले. श्री. शिंदे म्हणाले की आयुक्त बांगर यांचे नवी मुंबईतील काम प्रशंसनीय आहे. ज्याप्रमाणे त्यांनी नवी मुंबई शहराला स्वच्छ आणि सुंदर शहर ही ओळख निर्माण करुन दिली. हीच अपेक्षा ठाण्याबद्दल आहे. बांगर यांच्या कार्यकाळात ठाणे शहराचाही कायापालट होईल आणि एक स्वच्छ व सुंदर ठाणे पहायला मिळेल.
यावेळी श्री बांगर यांनी मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियान आणि महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पना व ध्येयानुसार विकास कामे सुरू आहेत. ठाणे सुंदर व स्वच्छ दिसावे, वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी महापालिका काम करत असल्याचे श्री. बांगर यांनी यावेळी सांगितले.