
दैनिक स्थैर्य | दि. ११ मार्च २०२३ | फलटण |
आजच्या धावपळीच्या युगात महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. महिला स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत, या जाणिवेतून सर्वरोग मोफत निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्याला जपणे आपल्या हातात असून आपले आरोग्य व्यवस्थित राहण्याकरिता निश्चितच हे शिबिर उपयोगी ठरणार आहे. या शिबिरासाठी सेवासदन लाईफ लाईन संस्थेचे होत असणारे सहकार्य व कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा अॅड. सौ. मधुबाला भोसले यांनी केले.
जागतिक महिला दिन निमित्ताने श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूह फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण, श्रीराम बझार व स्वयंसिद्धा महिला संस्था समूह यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी सर्वरोग मोफत निदान व मोफत उपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून अॅड. सौ. भोसले बोलत होत्या. यावेळी श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, श्री सद्गुरू गृह तारण संस्थेचे चेअरमन तुषार गांधी, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशासकीय संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले, सेवा सदन लाईफ लाईनचे डॉक्टर, स्वयंसिद्धाच्या संचालिका उपस्थित होत्या.
अॅड. सौ. भोसले म्हणाल्या, स्वतःचे आरोग्य जर आपण जपले तरच आपण आपले कुटुंब व्यवस्थित जगवू शकतो, म्हणून महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांनी अशा मोफत शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. यावेळी डॉ. प्रियांका गायकवाड, डॉ. रेवती पवार, डॉ. प्रसाद कवारे यांनी रोग निदान व उपचार याविषयी मार्गदर्शन केले. श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक श्री. दिलीपसिंह भोसले यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबिरास डॉ. राहुल वालेकर, डॉ. दिव्या मॅडम, डॉ. सिमरन, डॉ. किरण मॅडम, डॉ. लता बाबर, रवींद्र बाबर त्याचबरोबर सागर भोसले व सर्व सहकारी यांनी महिलांच्या आरोग्याची तपासणी व उपचार केले. बहुसंख्य महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. ब्रिलियंट अकॅडमीचे कु. रितू कहार व कु. धनश्री तेली यांची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे सीईओ संदीप जगताप यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. सौ. मधुबाला भोसले यांनी स्वागत केले. प्रदीप चव्हाण यांनी आभार मानले.