
दैनिक स्थैर्य | दि. 08 एप्रिल 2025 | फलटण | राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करावी, सरकारने निवडणुकीच्या काळात सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. पण सरकारने कर्जमुक्तीचे कुठलेही आश्वासन पूर्ण केले नाही, अशा फसव्या सरकारणे लवकरात लवकर राज्यातील सर्व शेतकर्यांना कर्जमुक्त करावे अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतिने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
रयत क्रांती संघटना ही माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांची आहे, त्यांच्या संघटनेने सरकार विरोधी निवेदन दिल्याने सरकारला घरचा आहेर दिला असल्याची चर्चा सुरू आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सरकारने सरसकट सर्व शेतकर्यांना कर्जमुक्त करु शेतकर्यांचा सातबारा कोरा करु अशी अनेक आश्वासने दिली होती. पाच सहा महिने उलटूनही सरकारने कोणत्याही प्रकारची कर्जमाफी केली नाही. उलट निवडणुकीच्या वेळी जाहिरनाम्यात पिक कर्ज माफिचा स्पष्ट उल्लेख असुनही अद्यापही कोणतीच प्रकारच्या कर्जमाफी केली नाही.
उलट सरकाराने ३१ मार्च पर्यत सर्व थकीत पिक कर्ज लवकरात लवकर भरा असे निर्देश दिले होते. यावरून हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे. विकास सेवा सोसायट्या, पतसंस्था, बॅंकांच्या वसुली अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे.

सरकारने कर्जवसुली त्वरीत थांबवावी अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात येईल अशा इशारा रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब ढोपरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनावरती रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब ढोपरे, अनिकेत करचे, अनिल वाघमारे, बापू लांडगे, अनिल अभंग यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.