दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२१ । सातारा । राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या कृपा आशिर्वादाने ज्यांनी पन्नास वर्ष सत्ता भोगली त्या घराण्याचे वंशज आमदार शिवेंद्रसिंहराजे ऐनवेळी पवारांना पाठ दाखवून भाजपमध्ये गेले . जिल्हा बँकेच्या सत्ता समीकरणातून त्यांना बाजूला करावे अन्यथा त्यांच्या समवेत असणाऱ्या पॅनलला माझा विरोध असेल अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी नेते व जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी केली .
पवारांनी पत्रकार परिषदेत थेट शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर शरसंधान करत त्यांच्यावर विरोधाची तोफ डागली . पवारांचा हा आंतरविरोध सुरू झाल्याने जिल्हा बँकेच्या राजकीय समीकरणांचा तणाव वाढला आहे .
पवार पुढे म्हणाले ज्यांनी साताऱ्यातील बँका बुडविल्या त्यांना दोन वर्ष बँकेचे चेअरमन का ठेवण्यात आले आहे . ज्या शरद पवारांमुळे या भोसले घराण्याने चव्वेचाळीस वर्ष सत्ता उपभोगले त्या घराण्याचे वारसदार विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोयीस्कर राजकारण करत भाजप प्रवेश केला . मग आता राष्ट्रवादीचे त्यांच्याशी का सोयरिक करत आहे ? ही भूमिका म्हणजे आमचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा अपमान आहे . भाजपच्या राजकारणाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर कारवाई होत असेल तर भाजपचे आमदार आपल्या बरोबर कशाला हवेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला . सातारा पालिकेची निवडणूक जवळ आली आहे . त्यामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात शिवेंद्रसिंह राजे यांना आत्ताच बाजूला ठेवा, अन्यथा नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण सातारकरांना काय उत्तर देणार ? अशी राजकीय टोलेबाजी त्यांनी केली .
सोसायटी मतदारसंघावर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे त्यामुळे शिवेंद्र राजे यांच्या असण्याचा काहीच फरक पडत नाही . जर . शिवेंद्रराजे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन जर राष्ट्रवादीत प्रवेश केला तर त्यांचे पहिले स्वागत मी करेल असे दीपक पवार म्हणाले .बँकेच्या संचालक मंडळावर स्वीकृत संचालक म्हणून जाणार नाही अशी थेट भूमिका त्यांनी मांडली.