
के. बी. बायो ऑरगॅनिक्सने अत्याधुनिक ROC तंत्रज्ञानावर आधारित ‘मायकोरिस’ बायो-फर्टिलायझर बाजारात आणले आहे. पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी हे वरदान ठरणार असून, १३ राज्ये आणि ४ देशांत याची धडक असणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 03 जानेवारी : भारतीय शेतीला रासायनिक विळख्यातून बाहेर काढून शाश्वत आणि विज्ञानावर आधारित प्रगतीकडे नेण्यासाठी फलटणच्या ‘के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लि.’ या कंपनीने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. कंपनीने अत्याधुनिक ‘आरओसी’ (ROC – Root Organ Culture) तंत्रज्ञानावर आधारित ‘मायकोरिस’ (Mycorrhiza Bio-Fertilizer) हे क्रांतिकारी उत्पादन बाजारात दाखल केले असून, यामुळे कृषी क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शेतीसाठी झटणाऱ्या के. बी. बायो ऑरगॅनिक्सने आपल्या हाय-टेक प्रयोगशाळेत अनुभवी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे उत्पादन विकसित केले आहे. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन ‘मायकोरिस प्रीमियम’ आणि ‘मायकोरिस’ अशा दोन श्रेणींमध्ये हे उपलब्ध करून देण्यात आले आहे. पिकाची अवस्था आणि जमिनीचा प्रकार पाहून शेतकरी योग्य पर्याय निवडू शकणार आहेत.

काय आहे ‘आरओसी’ तंत्रज्ञान आणि ‘ट्रिपल ॲक्शन’ फॉर्म्युला?
कंपनीचे उत्पादन युनिट हे पूर्णपणे ROC तंत्रज्ञानावर आधारित असून, अशी प्रगत सुविधा असलेल्या देशातील मोजक्या कंपन्यांमध्ये आता फलटणच्या के. बी. बायो ऑरगॅनिक्सचा समावेश झाला आहे. या युनिटची उत्पादन क्षमता दररोज तब्बल ७,००० बॉटल्स इतकी प्रचंड आहे. ‘मायकोरिस’ हे पिकांसाठी तिहेरी कार्यपद्धतीचा (Triple Action) लाभ देते: १. मुळांची मजबूत आणि खोलवर वाढ करणे. २. जमिनीतील पोषकद्रव्यांचे अधिक कार्यक्षम शोषण करणे. ३. पिकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती आणि ताण सहनशीलता वाढवणे.
१३ राज्ये आणि ४ देशांत डंका!
या उत्पादनाच्या लोकार्पण प्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सचिन यादव यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “‘मायकोरिस’चे लोकार्पण हे २०२६ च्या सुरुवातीलाच नवकल्पना आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम आणि निसर्गस्नेही शेतीकडे घेऊन जाणे हेच आमचे ध्येय आहे.” लवकरच हे उत्पादन भारतातील १३ राज्यांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर ४ देशांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यामुळे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाला कंपनीतील वरिष्ठ अधिकारी, संशोधक आणि सर्व टीम सदस्य उपस्थित होते. फलटणमधून सुरू झालेला हा कृषी बदलाचा प्रवास आता जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी सज्ज झाला आहे.

